मुंबई - दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात आंबा महोत्सवाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या ३० एप्रिल रोजी सायंकाळी ६ संपन्न होणार आहे. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे शिंदे सेनेचे खासदार रविंद्र वायकर यांच्या संकल्पनेतून महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या महोत्सवाला केंद्रीय मंत्री, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांच्या बरोबरच देशाच्या विविध राज्यातील खासदार व आमदारही उपस्थित राहणार आहेत. ३० एप्रिल ते १ मे (महाराष्ट्र दिन) पर्यंत आंबा महोत्सव येथे संपन्न होणार आहे. या महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे ही आयोजन करण्यात येणार आहे.
कोकणातील देवगड व रत्नागिरीतील हापूस आंबा महाराष्ट्रात व देशभरात खूपच प्रसिद्ध आहे. कोकणातील शेतकऱ्यांना विविध राज्यांमध्ये थेट बाजारपेठ उपलब्ध व्हावी, त्यांना जास्तीत जास्त नफा मिळावा, आंब्याच्या निर्यातीला अधिक चालना मिळावी, या उदात्त हेतूने दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात या दोन दिवसीय आंबा महोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवामुळे ग्रामीण भागातील उद्योजकांना मोठ्या प्रमाणात बाजारपेठ उपलब्ध होणार असल्याची माहिती खासदार वायकर यांनी लोकमतला दिली.
या महोत्सवाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते व्हावे यासाठी त्यांची भेट घेतली होती. प्रत्येक राज्यातील जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या फळांना जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी राज्यांनी प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेटी दरम्यान व्यक्त केले होते अशी माहिती त्यांनी दिली.
दिल्लीतील जास्तीत जास्त आंबा प्रेमीनी या महोत्सवाला भेट देऊन कोकणातील आंबा, अन्य उत्पादकांना तसेच शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन खासदार रविंद्र वायकर यांनी केले आहे.