Join us  

संविधान दिनाबाबत पंतप्रधानांकडून देशाची दिशाभूल, विखे पाटील यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2018 4:46 PM

संविधान दिनाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची दिशाभूल केल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. 

मुंबई : संविधान दिनाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची दिशाभूल केल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणाले की, मुंबईमध्ये भाषण करताना पंतप्रधानांनी जणू असा आभास निर्माण केला की, देशात त्यांनीच सर्वप्रथम संविधान दिवस साजरा करण्यास सुरूवात केली. परंतु, ही वस्तुस्थिती नसून, महाराष्ट्रात 2008 पासून संविधान दिवस सर्वत्र साजरा केला जातो. तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारने दि. 24 नोव्हेंबर 2008 रोजी यासंदर्भात शासन निर्णय जारी करून सर्व शासकीय-निमशासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, शाळा-महाविद्यालयांमध्ये संविधान दिन साजरा करण्याचे आदेशही दिले होते.

त्यानुसार मागील 9 वर्षे राज्यात सर्वत्र संविधान दिवस मोठ्या उत्साहात साजरा होत आला आहे. दरवर्षी या निमित्ताने संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन, संविधान यात्रा तसेच इतर कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मात्र, संविधान दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतल्यानंतर काँग्रेसने कधी त्याचा गाजावाजा केला नाही किंवा त्याला केवळ एक ‘इव्हेंट’ म्हणून साजरा केला नाही; तर संविधानाप्रती आदर व्यक्त करण्यासाठीच त्याचे आयोजन केले. पंतप्रधानांनी महाराष्ट्रात येऊन त्यांच्याच काळात देशामध्ये संविधान दिवस साजरा करण्यास सुरूवात झाल्याचे ढोल बडवले. मात्र या निर्णयाची महाराष्ट्रात मागील 9 वर्षांपासून अंमलबजावणी होत असल्याबद्दल त्यांनी साधा उल्लेखही केला नाही, हे दुर्दैव असल्याचे विखे पाटील यांनी म्हटले आहे.  आणीबाणीसंदर्भात भारतीय जनता पक्ष नकारात्मक राजकारण असल्याचीही टीका त्यांनी केली. भाजप स्पष्ट बहुमतानिशी सत्तेत येऊन आता चार वर्ष उलटली आहेत. या चार वर्षात जनतेला ‘अच्छे दिन’ तर दिसलेच नाही. उलटपक्षी भाजपने दिलेले प्रत्येक आश्वासन जुमला असल्याचे सिद्ध झाले. देशाची आर्थिक व्यवस्था डळमळीत झाली, बॅंकांचे अर्थकारण उद्धवस्त झाले, पेट्रोल-डिझेल महाग झाले,रूपयाची किंमत घसरली, व्यापार-उद्योग डबघाईस आले, बेरोजगारीचे प्रमाण वाढले, शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढले, काश्मिरातील परिस्थिती अत्यंत बिकट झाली, असे राधाकृष्ण विखे पाटील पुढे म्हणाले.

दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काळात पाकिस्तानचे एक घावात दोन तुकडे करण्यात आले. बांग्लादेशची निर्मिती करून भारताची पूर्व सीमा सुरक्षित करण्यात आली. आपल्याला इंदिरा गांधी यांच्यासारखे कणखर निर्णय घेता येत नाहीत, याचे भाजपला शल्य आहे. भाजप सरकारने पाकिस्तानात ‘सर्जिकल स्ट्राईक’ केला. पण त्याचे परिणाम कुठेच दिसून येत नाहीत. आता काश्मिरचा प्रश्न इतका चिघळला की, तेथील सरकारमधून भाजपला अक्षरशः पळ काढावा लागला आहे. आता या सर्व प्रश्नांवर लोक भाजपला जाब विचारू लागले आहेत. भाजपकडे त्यावर कोणतेही उत्तर नाही. आपण चार वर्षात काय केले, याबद्दल काहीही सांगता येत नसल्याने भाजपने चार दशकांपूर्वी काय घडले, यावर बोलायला सुरूवात केली आहे. लोकांची दिशाभूल करण्यासाठी, देशातील ज्वलंत समस्यांवरून लोकांचे लक्ष इतरत्र वळविण्यासाठी केलेली ही एक खेळी आहे. पण देशातील जनता सूज्ञ आहे आणि या नकारात्मक राजकारणाची भाजपला मोठी किंमत सरकारला चुकवावी लागेल, असा इशाराही विखे पाटील यांनी यावेळी दिला.

 

टॅग्स :राधाकृष्ण विखे पाटील