भाज्यांचे भाव भिडले गगनाला
By Admin | Updated: November 19, 2015 04:03 IST2015-11-19T04:03:30+5:302015-11-19T04:03:30+5:30
कांद्याचे वाढते भाव आणि ऐन दिवाळीत तूरडाळीने मध्यमवर्गीयांच्या तोंडाला फेस आणला आहे. आता त्यात भर म्हणून की काय भाज्यांचे दरही गगनाला भिडत आहेत.

भाज्यांचे भाव भिडले गगनाला
- लीनल गावडे, मुंबई
कांद्याचे वाढते भाव आणि ऐन दिवाळीत तूरडाळीने मध्यमवर्गीयांच्या तोंडाला फेस आणला आहे. आता त्यात भर म्हणून की काय भाज्यांचे दरही गगनाला भिडत आहेत. महागाईमुळे आधीच कंबरमोड होत असताना आता टोमॅटोच्या दरांनीही शंभरी गाठली आहे. यामुळे शंभरीच्या घरात पोहोचलेला टोमॅटो मंडईतून गायब होऊ लागल्याचे चित्र आहे.
महागाईचा फास मध्यमवर्गीयांच्या गळ््यातून काही सुटता सुटत नाही. कांदा आणि तूरडाळीनंतर आता टोमॅटोच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. एरवी ५ ते १० रुपये किलोने विकले जाणारे टोमॅटो थेट ८० ते १०० रुपये किलो झाल्यामुळे अनेक सामान्य ग्राहकांनी टोमॅटोकडे पाठ फिरवली आहे. भाजी मंडईतही अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या भाजी व्रिकेत्यांकडे टोमॅटो पाहायला मिळतात.
शेवपुरी, भेळ, पावभाजी आणि अन्य खाद्यपदार्थांमध्ये टोमॅटो वापरला जातो. टोमॅटोच्या वाढत्या किमतीचा परिणाम खाद्यपदार्थ विक्रेत्यांवरदेखील झाला आहे. अनेक फेरीवाल्यांनी खाद्यपदार्थांमधून टोमॅटो हद्दपारच करून टाकले आहे. तर रसभाज्यांना टोमॅटो लागतो म्हणून अनेक गृहिणींनी पालेभाज्यांना पसंती दिली आहे. पण पालेभाज्यांच्या बाबतीतही काही तसेच आहे. पालेभाज्यांच्या जुडींच्या किमतीत फरक पडला नसला तरी त्या जुडींमधील भाजी मात्र कमी झाली आहे.
हल्ली पसंतीस उतरलेल्या चायनीज खाद्यपदार्थांमध्ये वापरला जाणारा कोबीसुद्धा यात मागे नाही. कोबीसारखी नाक मुरडून खाल्ली जाणारी भाजी चायनीजच्या चमचमीत पदार्थांमुळे पसंतीस पडू लागली आणि त्यांची मागणी वाढली. पण आता कोबीचा अगदी तळहाताहून लहान असणारा गड्डा १० ते २० रुपये असल्यामुळे चायनीज खाद्यपदार्थ विक्रेत्यांवरही याचा परिणाम झाला आहे. याशिवाय गवार, भेंडी, तोंडली, पापडी, गाजर या भाज्यांच्या किमतीतही ५ ते १० रुपयांनी वाढल्या आहेत. साधारण नोव्हेंबर डिसेंबरच्या सुमारास मटार येतो. पण मटारनेसुद्धा शंभरी पार केल्यामुळे मटार
खरेदीचे प्रमाणही घटले आहे, असे दादर येथील एका भाजी व्रिकेत्याने सांगितले.
भाजी किलोने घेण्यापेक्षा भाज्यांचे वाटे लोकांना परवडत आहेत. किलोने मिळणाऱ्या भाज्यांमध्ये वजन कमीअधिक होण्याची शक्यता असते. मात्र वाटा लावलेल्या भाज्यांचा अंदाज आधीच येत असल्याने लोक वाट्याने मिळणाऱ्या भाज्या घेत आहेत. पण भाज्यांची ही महागाई लवकर कमी व्हावी, अशी गृहिणींची मागणी आहे.
कोथिंबीर झाली स्वस्त
मध्यंतरी कोथिंबिरीच्या चार ते पाच काड्याही १० ते १५ रुपयांना मिळत होत्या. सध्या कोथिंबीरच्या किमतीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. कोथिंबिरीची मोठ्यातील मोठी जुडीसुद्धा आता ५ ते १० रुपये इतकी आहे.
पावभाजीत टोमॅटो, मटार भरपूर लागतो. पण सध्याचे भाज्यांचे भाव बघता पावभाजीत टोमॅटो आणि मटारची कमतरता भरून काढण्यासाठी अन्य पदार्थांचा वापर करावा लागत आहे. सॅलडसाठी टोमॅटो देणेसुद्धा आम्ही बंद केले आहे.
- पावभाजी विक्रेता, मुलुंड (प.)
डाळी आणि भाज्यांमध्ये टोमॅटो आवर्जून वापरला जातो. टोमॅटोच्या किमती पाहता आता जेवणात फार विचार करून टोमॅटोचा वापर करावा लागतो.
- सुरेखा जाधव,
हिंदू कॉलनी, दादर
टोमॅटो आणि इतर भाज्यांचे भावही न परवडणारे आहेत. पालेभाज्या १० रुपये जुडी मिळते. पण त्यातली भाजी कमी झाली आहे.
-अमृता भोगले, गोरेगाव