पुरातन वास्तूंचा वारसा जपणे, पुढे नेण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:26 IST2021-02-05T04:26:20+5:302021-02-05T04:26:20+5:30

उद्धव ठाकरे : मुख्यमंत्री म्हणून महापौरांच्या जागेवर बसेन, असे स्वप्नातही वाटले नव्हते लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : सव्वाशे वर्षानंतरही ...

Preservation of antiquities, the need to move forward | पुरातन वास्तूंचा वारसा जपणे, पुढे नेण्याची गरज

पुरातन वास्तूंचा वारसा जपणे, पुढे नेण्याची गरज

उद्धव ठाकरे : मुख्यमंत्री म्हणून महापौरांच्या जागेवर बसेन, असे स्वप्नातही वाटले नव्हते

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : सव्वाशे वर्षानंतरही भक्कम असलेली महापालिका मुख्यालयाची वास्तू, किल्ले अशा पुरातन वास्तूंचा वारसा मुंबईला लाभला आहे. तो जपणे व पुढे नेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी केले. भिंतीलापण कान असतात, असे बोलले जाते. मात्र उद्यापासून पालिका मुख्यालयातील भिंती बोलू लागतील व आपला इतिहास सांगतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मुंबई महापालिका आणि महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने महापालिका मुख्यालयात हेरिटेज वॉक सुरू करण्यात येणार आहे. मुंबईकर व पर्यटकांना या पुरातन वास्तूची सफर घडविणाऱ्या उपक्रमाची सुरुवात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आली. यावेळी जुन्या आठवणींना उजाळा देताना ते पुढे म्हणाले की, १४ वर्षांचा असताना मी पहिल्यांदा महापौर निवडणुकीच्या निमित्ताने या वास्तूत आलो होतो. पण मुख्यमंत्री म्हणून महापौरांच्या जागेवर कधी बसेन, असे स्वप्नातही वाटले नव्हते, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

महापालिका म्हणजे गोंधळ, नगरसेवकांची आरडाओरड असे चित्र आजपर्यंत होते. मात्र यापुढे येथील प्रत्येक भिंत, कोपरा, दालन बोलतील, मुंबईच्या जडणघडणीचा इतिहास सांगतील. येथील प्रत्येक कलाकसुरीला, पुतळ्यांना अर्थ आहे. या वास्तूत अनेक थोर व्यक्ती घडले आहेत. येथील हेरिटेज वॉक तो इतिहास जिवंत करतील, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, पर्यटन राज्यमंत्री अदिती तटकरे, महापौर किशोरी पेडणेकर आणि आयुक्त इक्बाल सिंह चाहल उपस्थित होते.

* शेवटी लेकाने मुख्यालयात आणले : अजित पवार

१९९० पासून विधिमंडळात आहोत, मात्र कधी पालिका मुख्यालयात येण्याचा योग्य आला नाही. आयुक्त चहल व यापूर्वीच्या आयुक्तांनीही कधी बोलावले नाही. शेवटी लेकाने इमारतीत आणले, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आदित्य ठाकरे यांचे कौतुक केले. तसेच हेरिटेज वॉकला मराठी नाव शोधावे, असेही महापालिकेला ठणकावले. मुंबई महापालिका शिवसेनेच्या ताब्यात आहे, शहराचा बकालपणा दूर करण्यासाठी येथील पदपथ अतिक्रमणमुक्त केले पाहिजे. टप्प्याटप्याने मुंबई शहर अतिक्रमणमुक्त करण्यासाठी पावले उचलणे आवश्यक आहे, असे त्यांनी सुनावले. मुंबईतील नाइट लाइफ ही एक वेगळी दुनिया आहे. तरुण पिढीला ही योजना नक्की आवडेल, असे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले.

............

Web Title: Preservation of antiquities, the need to move forward

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.