विसर्जनासाठी प्रशासन सज्ज
By Admin | Updated: September 8, 2014 00:13 IST2014-09-08T00:13:39+5:302014-09-08T00:13:39+5:30
सोमवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी होणाऱ्या गणेशमूर्ती विसर्जनाकरिता पोलीस आणि पालिका प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे

विसर्जनासाठी प्रशासन सज्ज
नवी मुंबई : सोमवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी होणाऱ्या गणेशमूर्ती विसर्जनाकरिता पोलीस आणि पालिका प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. शहरातील विसर्जन तलाव आणि मुख्य मार्गांवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांचा तिसरा डोळा कार्यरत राहणार आहे.
सोमवारी शहरात २१७ सार्वजनिक तर सुमारे ६७५९ घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन होणार आहे. त्याकरिता पोलीस प्रशासनासह महापालिकेनही जय्यत तयारी केली आहे. वाशी येथील मुख्य विसर्जन स्थळाकडे जाणाऱ्या गणेशमूर्तींवर पुष्पवृष्टी करण्यासाठी शिवाजी चौक येथे पालिकेतर्फे भव्य व्यासपीठ उभारले जाणार आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी महापालिका क्षेत्रात एकूण २३ विसर्जन स्थळांवर गणेशमूर्तींचे विसर्जन होणार आहे. त्याकरिता प्रत्येक तलावांच्या ठिकाणी स्वयंसेवक, लाईफगार्ड कार्यरत ठेवले आहेत. तर मूर्ती तलावामध्ये नेण्यास तराफ्यांची व्यवस्था देखील केली आहे. पर्यावरणाची जपणूक करण्याकरिता शहरातील १४ तलावांमध्ये इटालियन गॅबियन वॉल तयार केल्या आहेत.
शहरात वाशी सेक्टर ७ येथील तलाव आणि कोपरखैरणे सेक्टर १९ येथील तलावाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विसर्जन होत असते. त्याकरिता या दोनही ठिकाणी मोठ्या मूर्तींच्या विसर्जनासाठी यांत्रिक तराफे ठेवले जाणार आहेत. त्याशिवाय सर्वच तलावांवर पर्यायी क्रेनची व्यवस्था प्रशासनातर्फे करण्यात आलेली आहे. तर विसर्जनाच्या मार्गावरील रस्त्यांची डागडुजी करून पुरेशी विद्युत रोषणाई करण्याचे कामही युद्धपातळीवर सुरु आहे. नवी मुंबई पोलिसांमार्फत महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. त्याद्वारे गणेश विसर्जनातील हालचालींवर पोलिसांचा तिसरा डोळा दक्ष राहणार आहे. त्याशिवाय सुमारे बाराशे पोलीस अधिकारी-कर्मचारी, २ एसआरपीएफ तुकड्या, १ क्यूआरटी तुकडी, १ आरसीपी तुकडी तसेच ४ स्ट्रायकिंग फोर्स देखील बंदोबस्तावर राहणार असल्याचे परिमंडळ १ चे पोलीस उपआयुक्त शहाजी उमाप यांनी सांगितले. (प्रतिनिधी)