गणरायाच्या स्वागताची तयारी
By Admin | Updated: August 29, 2014 00:39 IST2014-08-29T00:39:43+5:302014-08-29T00:39:43+5:30
गणरायाच्या स्वागतासाठी पनवेल व नवी मुंबईकरांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. गुरुवारी सर्व बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी ग्राहकांनी प्रचंड गर्दी केली होती

गणरायाच्या स्वागताची तयारी
नवी मुंबई : गणरायाच्या स्वागतासाठी पनवेल व नवी मुंबईकरांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. गुरुवारी सर्व बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी ग्राहकांनी प्रचंड गर्दी केली होती. उत्सव शांततेमध्ये पार पाडण्यासाठी पोलीस व महापालिका प्रशासनानेही आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या आहेत.
पोलीस आयुक्तालय क्षेत्रामध्ये जवळपास ३६१ सार्वजनिक व ५६,५०० घरगुती गणरायांची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. खरेदीसाठी आज अखेरचा दिवस असल्यामुळे नागरिकांनी सर्वच बाजारपेठांमध्ये गर्दी केली होती. सजावटीच्या साहित्याची खरेदी केली जात होती. सार्वजनिक मंडळांमध्येही धावपळीचे वातावरण होते. कार्यकर्ते सजावटीवर शेवटचा हात फिरविण्यात मग्न होते. गणरायास आणण्यासाठी वाहनांची, ढोल ताश्यांची सोय करण्यातही अनेकजण व्यस्त होते. वाशी सेक्टर ९ परिसरामध्ये अनेकांनी रस्त्यावर दुकाने थाटली होती. खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकांनीही रस्त्यावर दुसऱ्या लेनपर्यंत वाहने उभी केली होती. यामुळे या परिसरात वारंवार वाहतूक कोंडी होत होती. एपीएमसी परिसरातील घाऊक बाजारपेठेमध्येही मोठ्याप्रमाणात गर्दी झाली होती.
पोलीस प्रशासनाने सुरक्षेसाठी आवश्यक ती खबरदारी घेतली आहे. मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी व नागरिकांनीही काय खबरदारी घ्यावी याविषयी पत्रके वाटण्यात आली आहेत. साडेचार हजार अधिकारी व कर्मचारी बंदोबस्तासाठी उपलब्ध असून एसआरपीचे जवानही तैनात करण्यात येणार आहेत.