Join us  

रेल्वे स्थानकाबाहेरील प्रीपेड टॅक्सी स्टॅण्ड बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2020 2:21 AM

रेल्वे स्थानकाबाहेरील एकमेव प्रीपेड टॅक्सी स्टॅण्ड बंद करण्यात आले आहे.

मुंबई : लोकमान्य टिळक टर्मिनस येथे शनिवारी प्रीपेड रिक्षा स्टॅण्ड सुरू करण्यात आले असताना, दुसरीकडे रेल्वे स्थानकाबाहेरील एकमेव प्रीपेड टॅक्सी स्टॅण्ड बंद करण्यात आले आहे. यासाठी आरटीओ आणि रेल्वेमध्ये समन्वयाचा अभाव कारणीभूत असल्याचा आरोप स्वाभिमानी टॅक्सी रिक्षा युनियनने केला आहे.

याबाबत स्वाभिमानी टॅक्सी रिक्षा युनियन मुंबई अध्यक्ष के़ के़ तिवारी म्हणाले की, दादर, मुंबई सेंट्रल, सीएसटी, वांद्रे कुर्ला येथे ना नफा ना तोटा या तत्त्वावर रेल्वे स्थानकाबाहेर प्रीपेड टॅक्सी स्टॅण्ड सुरू करण्यात आले होते. ही सहा स्थानके वेगवेगळ्या संघटनांना देण्यात आली होती. युनियन टॅक्सीचालकांकडून १५ रुपये सेवा शुल्क घेत होती.

मात्र, ते कमी होते, तरी संघटनेने स्वत: पैसे खर्च करून स्टॅण्ड सुरु ठेवले, पण इतर संघटनांनी स्टॅण्ड बंद केले. त्यामुळे मुंबई सीएसएमटी हे एकमेव प्रीपेड टॅक्सी स्टॅण्ड सुरू होते. याबाबत करार करताना युनियनचा आरटीओशी आणि आरटीओचा रेल्वेशी करार झाला होता, पण आता कराराचे नूतनीकरण करताना आरटीओने रेल्वेची जागा आहे, तर ती स्वत: परवानगी देऊ शकते, असे सांगत करार करण्यास नकार दिला. तर रेल्वेने आरटीओची परवानगी आवश्यक असल्याचे सांगितले, अन्यथा कंत्राट पद्धतीने टॅक्सी स्टॅण्ड घेण्याची सूचना केली. कंत्राटमध्ये एका वर्षासाठी काही लाख रक्कम भरणे आवश्यक होते.

टॅक्सीचा धंदा संपविण्याचा हा डाव

एलटीटी येथे रेल्वेने ओलाला एक वर्षासाठी तीन लाखांत आणि सीएसएमटी येथे मेरू कॅबला ४.५ लाख रुपयांत परवाना दिला. याबाबत तिवारी म्हणाले की, ओलाला सरकारने मान्यता दिली नाही, अशा टॅक्सीला रेल्वेने स्टॅण्डचे कंत्राट दिले आहे. त्या अ‍ॅप आधारित कंपन्यांना स्टॅण्डची आवश्यकता नाही. टॅक्सीचा धंधा संपविण्याचा हा डाव आहे.

टॅग्स :करमुंबईमहाराष्ट्र