समस्या सोडविण्याला प्राधान्य
By Admin | Updated: October 9, 2014 22:43 IST2014-10-09T22:43:00+5:302014-10-09T22:43:00+5:30
शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा खांद्यावर घेऊन जेव्हा आम्ही आंदोलनासाठी रस्त्यावर उतरलो, तेव्हा नागरिकांचे प्रश्न सोडविल्याशिवाय आम्ही माघारी येत नाही,

समस्या सोडविण्याला प्राधान्य
पनवेल : शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा खांद्यावर घेऊन जेव्हा आम्ही आंदोलनासाठी रस्त्यावर उतरलो, तेव्हा नागरिकांचे प्रश्न सोडविल्याशिवाय आम्ही माघारी येत नाही, असे आश्वासन आमदार विवेक पाटील यांनी गव्हाण येथील जाहीर सभेत केली.
१९० उरण विधानसभा मतदारसंघातील गव्हाण जिल्हा परिषद विभागामध्ये गव्हाण गावात झालेल्या जाहीर प्रचार सभेत शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार आमदार विवेक पाटील बोलत होते.
यावेळी विवेक पाटील यांनी, शेकापने केलेल्या कामांच्या जीवावर जनतेने मला चार वेळा निवडून दिले आणि पाचव्यांदा देखील मला मोठया मताधिक्याने निवडून देतील असा विश्वास व्यक्त केला. गव्हाण येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न शेकापने सोडविला तसेच वहाळ येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला सिडकोकडून साडे तीन कोटी रूपये खर्च करून अद्यावत शाळा बांधून घेतली. इतकेच नव्हे तर अशा प्रकारच्या शाळा या विभागातील सर्वच गावात सिडकोकडून बांधण्यात येतील अशी माहिती यावेळी विवेक पाटील यांनी दिली.
प्रास्ताविक तालुका चिटणीस नारायण घरत यांनी केले. यावेळी बोलताना युवा नेते सचिन ताडफळे म्हणाले की, आजकाल टीव्हीवर छत्रपतींच्या आशीर्वादाची जाहिरात केली जात आहे. परंतु छत्रपतींचा आशीर्वाद हा मावळ्यांच्यामागे, असा टोलाही त्यांनी लगावला. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र पाटील, भारिप बहुजन महासंघाचे रायगड जिल्हा अध्यक्ष दीपक मोरे यांनी आपले विचार मांडले. याप्रसंगी व्यासपीठावर ज्येष्ठ नेते शंकरशेठ पाटील, माजी नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे, तालुका चिटणीस नारायण घरत, साधना वाजेकर, पांडूमामा घरत, जी.बी.म्हात्रे, माधव पाटील आदी उपस्थित होते. (वार्ताहर)