मुंबई विद्यापीठाच्या गरवारे व्यवसाय शिक्षण आणि विकास संस्थेच्या मराठी पत्रकारिता वर्गाच्यावतीने देण्यात येणारा डॉ. अरुण टिकेकर पुरस्कार लोकमत.कॉमचे डेप्युटी मॅनेजर- ऑनलाइन कन्टेंट प्रविण मरगळे यांना रविवारी प्रदान करण्यात आला. दिवंगत पत्रकार दि. वि. गोखले यांच्या १०२ वी जयंती सोहळ्यानिमित्त झालेल्या या कार्यक्रमामध्ये या वार्षिक पुरस्कारांचं वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी सुशांत सावंत यांना विद्याधर गोखले पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर यावर्षी प्रथम आलेली वर्गाची माजी विद्यार्थिनी वनश्री राडये ही यावर्षीच्या दि. वि. गोखले पुरस्काराची मानकरी ठरली.
रविवारी झालेल्या या कार्यक्रमामध्ये साप्ताहिक विवेकच्या संपादक अश्विनी मयेकर या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी ‘स्वत:ला पत्रकार म्हणून घडवताना’ याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. आपल्याला पत्रकार का व्हायचं आहे, याचा आधी आपण सखोल विचार केला पाहिजे. तसेच पत्रकारिता हे केवळ रोजीरोटीचे साधन नाही तर लोकशिक्षण आणि प्रबोधनाचे माध्यम आहे, असे त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणामध्ये सांगितले.
दरम्यान, या सोहळ्यावेळी वर्गाच्या ‘गरवारे दर्पण’ या अंकाचे प्रकाशन देखील करण्यात आले. तसेच अखिल भारतीय साहित्य परिषद कोकण प्रांत आणि गरवारे व्यवसाय प्रशिक्षण संस्था यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय लेखन स्पर्धेचे पुरस्कार वितरणही करण्यात आले. या लेखन स्पर्धेमध्ये बाळकृष्ण परब यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तर डॉ.अनुप्रिया गायकवाड या द्वितीय आणि तनु शर्मा ह्या तृतीय क्रमांकाच्या मानकरी ठरल्या. नंदा कोकाटे आणि दिशिता खाचणे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक प्रदान करण्यात आले.
या सोहळ्याचं प्रास्ताविक गरवारेच्या वर्ग समन्वयक नम्रता कडू यांनी केलं. या कार्यक्रमाला साप्ताहिक विवेकच्या संपादक अश्विनी मयेकर या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्याचबरोबर ज्येष्ठ पत्रकार दुर्गेश सोनार, अखिल भारतीय साहित्य परिषद कोकण प्रांतचे कार्याध्यक्ष प्रविण देशमुख, गरवारेच्या पत्रकारिता वर्गाचे विषय शिक्षक ज्येष्ठ पत्रकार डॉ. सुरेशचंद्र वैद्य, ज्येष्ठ पत्रकार वैभव वझे आणि मुक्त पत्रकार मृदुला राजवाडे आदी मान्यवर उपस्थित होते.