प्रवीण दरेकर मातोश्रीवर!
By Admin | Updated: December 28, 2014 01:45 IST2014-12-28T01:45:16+5:302014-12-28T01:45:16+5:30
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी आमदार प्रवीण दरेकर तब्बल नऊ वर्षांनी मातोश्रीची पायरी चढले. शनिवारी दुपारी १च्या सुमारास त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

प्रवीण दरेकर मातोश्रीवर!
उद्धव ठाकरेंशी चर्चा : मनसेतील नाराजांना ओढण्यासाठी धडपड?
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी आमदार प्रवीण दरेकर तब्बल नऊ वर्षांनी मातोश्रीची पायरी चढले. शनिवारी दुपारी १च्या सुमारास त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. दोघांमध्ये तब्बल पाऊण तास बंद खोलीत चर्चा झाली. यामुळे नाराज दरेकर शिवसेनेत जाणार, अशा चर्चा सुरू झाल्या. मात्र मी अजून पक्षातच आहे. राजकीय वाटचालीबाबतचा निर्णय जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात जाहीर करेन. उद्धव यांची भेट घेऊन मुंबै बँकेचे भविष्यातील धोरण, त्यासाठी आवश्यक असलेले महापालिकेचे साहाय्य या विषयावर चर्चा केली, अशी प्रतिक्रिया देऊन दरेकर यांनी आणखी संभ्रम वाढविला.
दरम्यान, दरेकर यांच्यासह मनसेतील नाराज नेते, पदाधिकारी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करणार, अशी चर्चा मधल्या काळात होती. त्या पार्श्वभूमीवर मनसेतल्या अशा नाराजांना आपल्याकडे वळविण्यासाठी शिवसेनेही धडपड सुरू केल्याचे बोलले जाते. उद्धव-दरेकर भेटीत मनसेतल्या नाराजांना शिवसेनेत सामावून घेतले जाऊ शकते, याविषयीही चर्चा झाल्याचे समजते.
एकेकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू साथीदार अशी ओळख असलेले दरेकर दुपारी १च्या सुमारास आपल्या कारने मातोश्रीत धडकले. तेव्हा त्यांच्या कारवर मनसेचा झेंडा होता. पुढे सुमारे पाऊण तास उद्धव आणि दरेकर यांच्यात वन टू वन चर्चा झाली. या दोघांमधील चर्चेचा नेमका तपशील कळू शकला नाही. चर्चेनंतर मातोश्रीवरून बाहेर पडलेल्या दरेकर यांना माध्यमांनी प्रतिक्रियेसाठी अडविले तेव्हा ही सदिच्छा भेट होती, असे त्यांनी स्पष्ट केले.
मधल्या काळात मी मानसिक तणावाखाली होतो. त्या काळातही उद्धव यांच्याशी बोलणे झाले होते. उद्धव यांनी दोनदा फोन केले होते, त्यांच्याकडून मला आॅफर होती, असे दरेकर यांनी सांगितले. तुम्ही शिवसेनेत प्रवेश केला का, करणार का, याबाबत काय चर्चा झाली, या प्रश्नांना उत्तर देताना दरेकर म्हणाले, ‘मी मुंबै बँकेचा अध्यक्ष आहे. बँकेने पुनर्विकास योजनेच्या गृहकर्जांबाबत नवे धोरण आखले आहे. हे धोरण राबविण्यासाठी मुंबई महापालिकेची आणि राज्य शासनाची मदत लागेल. पालिकेत शिवसेनेची सत्ता असल्याने याविषयी चर्चा करण्यासाठी उद्धव यांची भेट घेतली. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेणार आहे.’ (प्रतिनिधी)
मी मनसेतच : मातोश्रीवर उद्धव यांची भेट घेऊन राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणारे प्रवीण दरेकर यांनी मी अजूनही पक्षातच आहे. तसेच आगामी राजकीय वाटचालीबाबतचा निर्णय जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात जाहीर करणार, असे सांगितले.
मनसेचा झेंडा मातोश्रीत : शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. मनसेत सामील झालेले नेते, पदाधिकारी बहुतांश शिवसैनिक होते. मधल्या काळात मराठीसह अन्य मुद्द्यांवरून दोन्ही पक्षांमध्ये अनेकदा हातघाई झाली. निवडणुकांमध्ये हे दोन्ही पक्ष शत्रू म्हणून लढले. या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच मनसेचा झेंडा मातोश्रीवर धडकला, तो दरेकर यांच्या गाडीसोबत. दरेकर यांनी मातोश्रीत प्रवेश केला तेव्हा त्यांच्या गाडीवर मनसेचा झेंडा होता.
पार्श्वभूमी : विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर पक्षाची धोरणे चुकली, असे विधान करून दरेकर यांनी पक्षाध्यक्ष राज ठाकरेंना घरचा अहेर दिला होता. यानंतर त्यांनी मनसेच्या सरचिटणीसपदाचा राजीनामा दिला. दरेकर यांच्यानंतर नाशिकचे माजी आमदार वसंत गीते यांनी राजीनामा दिला आणि या राजीनामा सत्राचे लोण राज्यभर पसरले. यावर राज यांनी पत्रक काढून सर्वांचे राजीनामे मंजूर करत आहे. अशा अडचणीच्या वेळी कोण सोबत आहे हे जाणवले, अशी भूमिका घेतली. दहा दिवसांपूर्वी राज यांनी मनसे नगरसेवकांची बैठक बोलावली होती. या बैठकीतून दरेकर यांचे बंधू व नगरसेवक प्रकाश दरेकर यांना बाहेर काढण्यात आले. तसेच राजीनामा मंजूर झालेल्यांशी संपर्क नको, असे आदेश मनसैनिकांना दिले. या घटनेनंतर तर राज-दरेकर यांच्यातली दरी आणखी रुंदावल्याचे बोलले जाते.