Join us  

बेस्ट न्यूज! मुंबईच्या रस्त्यांवर लवकरच 'ती' चालवणार बेस्ट बस

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2019 2:59 PM

बेस्टला मिळणार पहिली महिला चालक; प्रशिक्षण जोरात

मुंबई: बेस्ट ड्रायव्हर म्हटल्यावर डोळ्यासमोर एक विशिष्ट प्रतिमा उभी राहते. मात्र हीच प्रतिमा मोडण्याचं काम सध्या प्रतीक्षा दास करते आहे. सध्या प्रतीक्षा बेस्ट बस चालवण्याचं प्रशिक्षण घेत आहे. प्रशिक्षण काळातील तिची प्रगती पाहता प्रतीक्षा लवकरच प्रवाशांनी भरलेली बेस्ट बस मुंबईतील आव्हानात्मक रस्त्यांवरुन चालवताना दिसेल.सध्या 24 वर्षांची असलेली प्रतीक्षा बेस्टमधील पहिली महिला चालक आहे. गेल्या 6 वर्षांपासून माझी हीच इच्छा होती आणि अखेरीस आता ती पूर्ण होत आहे, अशी भावना प्रतीक्षानं व्यक्त केली. प्रतीक्षानं नुकतंच मॅकेनिकल इंजिनीयरिंग पूर्ण केलं आहे. प्रतीक्षाला खूप आधीपासूनच अवजड वाहन चालवण्याचं वेड आहे. ती स्पोर्ट्स बाईक, स्पोर्ट्स कारसोबतच बस आणि ट्रकदेखील चालवू शकते. सध्या प्रतीक्षा गोरेगाव आगारातील बस तिला देण्यात आलेल्या प्रशिक्षणाच्या मार्गावर चालवते. त्याआधी तिनं बेस्टच्या आगारात बस चालवण्याचं प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केलं. प्रतीक्षाला बस चालवता येईल, तिला स्टेअरिंगवर नियंत्रण ठेवणं जमेल का?, असे अनेक प्रश्न प्रशिक्षण देणाऱ्या कर्मचाऱ्यांना पडले होते. मात्र प्रतीक्षा अतिशय कमी वेळात बस चालवायला शिकली. महिला बसच्या ड्रायव्हर सीटवर बसू शकत नाही असं कोण म्हणतं, असा सवाल ती उपस्थित करते. ठाकूर कॉलेजमधून मॅकेनिकल इंजिनियरिंग पूर्ण करणाऱ्या प्रतीक्षाला आरटीओ अधिकारी व्हायचं आहे. 'आरटीओ अधिकारी होण्यासाठी अवजड वाहनांचा परवाना गरजेचा असतो. याशिवाय मला बसदेखील शिकायची होती. त्यामुळे सगळंच जुळून आलं,' असं प्रतीक्षानं सांगितलं. 'मी बस चालवायला सुरुवात केली तेव्हा बेस्टच्या प्रशिक्षकांच्या चेहऱ्यावर अनेक प्रश्न होते. या मुलीला जमेल का? इतक्या लहान मुलीला बस चालवता येईल का?, असे प्रश्न त्यांना पडले होते. मात्र सर्वकाही व्यवस्थित झालं,' अशी आठवण तिनं सांगितली.  

टॅग्स :बेस्ट