स्थानिकांच्या टोलमाफीसाठी प्रशांत ठाकूर यांचा पक्षत्याग
By Admin | Updated: October 9, 2014 22:36 IST2014-10-09T22:36:52+5:302014-10-09T22:36:52+5:30
प्रशांत ठाकूर यांनी स्थानिकांना टोलमाफी मिळावी याकरिता काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला. त्यांची मागणी रास्त असून पनवेलकरांना टोल फ्री झाला पाहिजे

स्थानिकांच्या टोलमाफीसाठी प्रशांत ठाकूर यांचा पक्षत्याग
पनवेल : प्रशांत ठाकूर यांनी स्थानिकांना टोलमाफी मिळावी याकरिता काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला. त्यांची मागणी रास्त असून पनवेलकरांना टोल फ्री झाला पाहिजे. ठाकूर यांनी स्वार्थासाठी नाही तर जनहितासाठी भाजपात प्रवेश केला असल्याची पावती परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पनवेलकरांना दिली. त्यांनी विरोधकांकडून होणाऱ्या आरोपाला सडेतोड उत्तर दिले.
पनवेल विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारार्थ स्वराज यांनी गुरुवारी खारघर येथील गुडविल बिल्डिंगसमोरील मैदानात सभा घेतली त्यावेळी त्या बोलत होत्या. जनहिताकरिता सध्याची लढाई असून सत्ताधारी पक्षात राहून लोकांच्या प्रश्नासाठी लढाई करणारे प्रशांत ठाकूर यांचे स्वराज यांनी कौतुक केले. याच कारणामुळे प्रशांत यांना उमेदवारी दिल्याचे स्पष्टीकरणही त्यांनी दिले.
महाराष्ट्रात भाजपचे सरकार येणार असून तसे वातावरण निर्माण झाले असल्याचे सांगत स्वराज यांनी दीडशे जागा निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला. शरद पवार यांच्यावर हल्ला चढवताना त्या म्हणाल्या, पवार देशाचे कृषिमंत्री असतानाही महाराष्ट्रात अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. मध्यप्रदेशाला कृषीक्षेत्राला उल्लेखनीय कामगिरी केली म्हणून पदक मिळाले. या उलट महाराष्ट्राचा विकास दर खाली घसरला. गेल्या पाच वर्षात राज्यातही एकही उद्योग आला नाही, यावरून राष्ट्रवादी आणि काँग्रेसने महाराष्ट्राचा विनाश करायचा जणूकाही विडाच उचलला आहे की काय अशी शंका निर्माण होत असल्याचा आरोप स्वराज यांनी केला.
ठाकूर यांनी जनहितासाठी इतके मोठे आंदोलन उभे केले. अशा उमेदवाराला संधी देण्याकरिता त्याचबरोबर पनवेलकरांनी आपल्या भागाचा विकास करून घेण्यासाठी कमळाच्या चिन्हापुढील बटन दाबावे व भाजपाला प्रचंड मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन केले.