प्रसाद यांना दोनदा हुलकावणी
By Admin | Updated: June 4, 2015 05:09 IST2015-06-04T05:09:07+5:302015-06-04T05:09:07+5:30
ठाणे शहर आयुक्तपदाची दोनदा हुलकावणी मिळाल्याने के. एल. प्रसाद यांनी नवी मुंबईच्या आयुक्तपदाचा राजीनामा दिला. मार्चमध्ये विजय कांबळे यांच्या निवृत्तीनंतर

प्रसाद यांना दोनदा हुलकावणी
सूर्यकांत वाघमारे, नवी मुंबई
ठाणे शहर आयुक्तपदाची दोनदा हुलकावणी मिळाल्याने के. एल. प्रसाद यांनी नवी मुंबईच्या आयुक्तपदाचा राजीनामा दिला. मार्चमध्ये विजय कांबळे यांच्या निवृत्तीनंतर त्यांच्या नियुक्तीची शक्यता असताना प्रसाद यांच्यापेक्षा सहा वर्षे कनिष्ठ अधिकारी परमवीर सिंग यांची ठाणे आयुक्तपदी नियुक्ती झाली. यामुळे के. एल. प्रसाद गेल्या दोन महिन्यांपासून राजीनाम्याच्या तयारीत होते.
मुंबईच्या आयुक्तपदी सन १९८१ बॅचचे राकेश मारिया यांच्या नियुक्तीने त्याच बॅचचे अधिकारी विजय कांबळे नाराज झाले होते. यावेळी त्यांची नाराजी दूर करण्यासाठी मुंबईच्या तुलनेच्याच ठाणे शहर आयुक्तपदी त्यांची नियुक्त करण्यात आली. त्यामुळे या ठिकाणी इच्छुक असलेल्या के. एल. प्रसाद यांची संधी हुकली. यावेळी इच्छा नसतानाही त्यांच्याकडे नवी मुंबई आयुक्तपदाचा कार्यभार देण्यात आला. परंतु ते नियुक्तीबाबत नाराजच होते. मात्र कांबळे यांच्या निवृत्तीनंतर एक वर्षाने त्यांना ठाणे आयुक्तपदाची संधी मिळेल अशीही आशा त्यांना होती. परंतु मार्च महिन्यात पुन्हा एकदा त्यांचा अपेक्षाभंग झाला. ठाण्याचे तत्कालीन आयुक्त विजय कांबळे यांच्या निवृत्तीनंतर प्रसाद यांच्यापेक्षा सहा वर्षे कनिष्ठ परमवीर सिंग यांची नियुक्ती झाली.
ही बाब प्रसाद यांच्या मनाला चांगलीच लागल्याने राजीनामा देण्याची मानसिकता झाली होती. परंतु नवी मुंबई आयुक्तालयातील सहकारी अधिकाऱ्यांनी केलेल्या विनंतीचा मान राखून त्यांनी दोन महिन्यानंतर राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्याची बाब आयुक्तालयातील कोणत्याही अधिकाऱ्याला सांगितली नव्हती. बदल्यांमध्ये होणाऱ्या दुजाभावाची शिकार ते ठरल्याची दबकी प्रतिक्रिया त्यांच्या सहकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.