Join us  

'वंचित आघाडी'त बंड; लक्ष्मण मानेंनी मागितला प्रकाश आंबेडकरांचा राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2019 2:32 PM

वंचित बहुजन आघाडीमध्ये उभी फूट पडण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.  

मुंबईः वंचित बहुजन आघाडीमध्ये उभी फूट पडण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.  वंचित आघाडीचे नेते लक्ष्मण माने यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत प्रकाश आंबेडकरांवर गंभीर आरोप केले आहेत. प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीचा राजीनामा द्यावा, असं म्हणत लक्ष्मण मानेंनी खळबळ उडवून दिली आहे. मी प्रकाश आंबेडकरांबरोबर काम करू शकत नाही.प्रकाश आंबेडकरांमुळेच लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची एकही जागा निवडून आली नाही. संघ आणि भाजपाच्या लोकांना प्रकाश आंबेडकरांनी वंचित आघाडीमध्ये घेतलं आहे. प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचा दुरुपयोग करत आहेत. संघ आणि आरएसएसच्या लोकांनी वंचित बहुजन आघाडी व्यापून टाकली आहे. त्यामुळे सध्याची वंचित आघाडी ही बहुजनांची नव्हे, तर उच्चवर्णीयांची झाली आहे. वंचित बहुजन आघाडी ही खरी आमची आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी तात्काळ राजीनामा द्यावा, असे लक्ष्मण माने म्हणाले आहेत. राज्यभर आम्ही खपलोय. पदरचे पैसे घालून काम केलंय. हे आयत्या बिळावरचे नागोबा असल्याचं म्हणत त्यांनी पडळकरांना लक्ष्य केले आहे.मी तत्त्वापासून कधीच चुकलो नाही, असंही लक्ष्मण माने म्हणाले आहेत. यावेळी लक्ष्मण माने यांनी गोपीचंद पडळकर यांना वंचित बहुजन आघाडीचं महासचिवपद दिल्यानं नाराजी व्यक्त केली आहे. लोकशाहीत मीडियाशी बोलण्याचं स्वातंत्र्य आहे. लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीनं काँग्रेस-राष्ट्रवादी किंवा इतर पक्षांशी आघाडी करायला हवी होती. लोकसभा निवडणुकीत आमच्यामुळे दहा जागा गेल्यात. प्रतिगामी पक्षांना मदत हा अधःपात होता आणि तो माझ्याकडून झाला. त्याचा मला पश्चात्ताप आहे. पदरचे पैसे घालून आम्ही काम केलं. मी गोपीचंद पडळकर यांचं नाव सुचवलं, पण ते अध्यक्षांनी माझ्याकडून वदवून घेतलं होतं. लाल दिव्याच्या गाड्या ओवाळून टाकल्यात, असंही लक्ष्मण माने म्हणाले आहेत. आंबेडकरवाद्यांच्या कळपात आरएसएसचे लोक कशाला?, असा प्रश्नही लक्ष्मण मानेंनी उपस्थित केला आहे. 

टॅग्स :वंचित बहुजन आघाडी