Join us  

प्रदीप शर्माचा एन्काउंटर स्पेशालिस्ट ते जन्मठेपेपर्यंतचा प्रवास; राजकारण, समाजकारणामुळे चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2024 8:31 AM

मनसुख हिरेन हत्याकांड प्रकरणी पुन्हा झाली होती अटक

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: गुन्हेगारांमध्ये दरारा असलेला एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. १०० हून अधिक जणांचा खात्मा करणारा शर्मा यास लखन भय्या एन्काउंटर प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. एन्काउंटर स्पेशालिस्ट ते वादग्रस्त कारवाई, समाजकारण, राजकारण आणि थेट जन्मठेपेपर्यंतच्या एकूणच घडामोडींमुळे तो चर्चेत राहिला आहे. 

१९८३ च्या पोलिस उपनिरीक्षक बॅचचा अधिकारी असलेला एन्काउंटर स्पेशालिस्ट शर्मा याने १०० हून अधिक गुन्हेगारांचा खात्मा केला आहे. दाऊद इब्राहिम याच्याशी संबंध असल्याच्या आरोपातून शर्मा यास ऑगस्ट २००८ रोजी खात्यातून निलंबित करण्यात आले. परंतु, हे आरोप सिद्ध होऊ न शकल्याने मे २००९ मध्ये त्यास पुन्हा सेवेत रुजू करून घेण्यात आले. मात्र, लखनभय्याच्या बनावट एन्काउंटर प्रकरणी २०१० मध्ये अटक झाली. सत्र न्यायालयात चाललेल्या खटल्यामध्ये लखनभय्या हत्याप्रकरणातून शर्मा याची ५  जुलै २०१३ रोजी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली होती.

राजकारणात एन्ट्री

सर्व आरोपांतून मुक्तता झाल्यानंतर तब्बल नऊ वर्षांनी शर्मा हा पोलिस दलात रुजू झाला. ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकात वरिष्ठ पोलिस निरीक्षकपदी कर्तव्यावर असताना २०१९ मध्ये राजीनामा देऊन तो शिवबंधनात अडकला. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत वसई-विरार भागातील हितेंद्र ठाकूर कुटुंबाची एकाधिकारशाही मोडून काढण्यासाठी  शिवसेनेने शर्मा यांना नालासोपारा येथे उमेदवारी दिली होती. मात्र, त्याचा पराभव झाला.

हिरेन हत्याकांडप्रकरणी पुन्हा झाली अटक

शर्मा याने आधीपासूनच पीएस फाउंडेशनच्या माध्यमातून अंधेरी पूर्व परिसरात सामाजिक कार्यात उडी घेतली आहे. तो या मतदारसंघात आपली पकड मजबूत करीत असताना  अँटिलियासमोर मिळालेली स्फोटके असलेली कार आणि मनसुख हिरेन हत्याप्रकरणात एनआयएने २०२१ मध्ये शर्मा यास अटक केली. जामिनावर बाहेर आल्यानंतर पुन्हा निवडणुकीच्या तयारीत असताना फेब्रुवारी महिन्यात त्याच्या घरावर आयकर विभागाने छापे मारून कारवाई केल्याने त्याच्या अडचणीत भर पडली होती.

टॅग्स :प्रदीप शर्मामुंबई पोलीसउच्च न्यायालय