Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलामुळे राज्याच्या नावलौकीकात भर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उदगार

By मनोहर कुंभेजकर | Updated: October 8, 2022 15:09 IST

Eknath Shinde: प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाच्या माध्यमातून अनेक होतकरू तरुण क्रीडापटू घडत आहेत ही अभिमानास्पद बाब असून यामुळे राज्याचा नावलौकिक भर पडत आहे असे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल रात्री पार्ल्यात काढले.

- मनोहर कुंभेजकरमुंबई  :  प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाच्या माध्यमातून अनेक होतकरू तरुण क्रीडापटू घडत आहेत ही अभिमानास्पद बाब असून यामुळे राज्याचा नावलौकिक भर पडत आहे असे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल रात्री पार्ल्यात काढले. या संकुलासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली. विलेपार्ले (पूर्व) येथील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त काल रात्री आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.

यावेळी स्थानिक आमदार अँड.पराग अळवणी, प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाचे अध्यक्ष अरविंद  प्रभू, डॉ.राम प्रभू, लीना प्रभू, डॉ.मोहन राणे, राजू रावल तसेच संकुलाचे इतर विश्वस्त यांच्यासह, प्रशिक्षक, क्रीडापटू उपस्थित होते. प्रारंभी डॉ. रमेश प्रभू यांच्या प्रतिमेस दीपप्रज्वलन करुन अभिवादन केले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध क्रीडा प्रशिक्षक व खेळाडूंना गौरविण्यात आले.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, येथील विलेपार्ल्याचे माजी आमदार,मुंबईचे माजी महापौर दिवंगत डॉ.रमेश प्रभू हे लोकप्रिय लोकप्रतिनिधी होते. त्यांनी नागरिकांच्या समस्या सोडविण्यासोबतच या क्रीडा संकुलाची उभारणी केली. या क्रीडा संकुलामधून अनेक होतकरू खेळाडू निर्माण झाले ज्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचा व राज्याचा नावलौकिक वाढविला.या  क्रीडा संकुलातून असे महान खेळाडू तयार होत असून या खेळाडूंना या संस्थेच्या माध्यमातून नेहमीच सहकार्य लाभले आहे.

विमानतळाशेजारील मेट्रो स्थानकास डॉ. रमेश प्रभू यांचे नाव देण्याची अपेक्षा यावेळी प्रभू कुटुंबियांनी व्यक्त केली. त्यांचे कार्य स्मरणात राहावे, यासाठी या मेट्रो स्थानकास प्रभूंचे नाव देण्याबाबत सकारात्मक विचार करू, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. या परिसरातील पुनर्वसन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :एकनाथ शिंदेमुंबई