प्रभादेवीमध्ये नवविवाहितेची आत्महत्या, मानसिक तणावामुळे पाऊल उचलल्याचा संशय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 01:29 IST2018-02-13T01:29:43+5:302018-02-13T01:29:54+5:30
इमारतीच्या २३व्या मजल्यावरून उडी घेत, २८ वर्षीय नवविवाहितेने सोमवारी आत्महत्या केली. केतकी गवांडे असे तिचे नाव आहे. या प्रकरणी दादर पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करत अधिक तपास सुरू केला आहे.

प्रभादेवीमध्ये नवविवाहितेची आत्महत्या, मानसिक तणावामुळे पाऊल उचलल्याचा संशय
मुंबई : इमारतीच्या २३व्या मजल्यावरून उडी घेत, २८ वर्षीय नवविवाहितेने सोमवारी आत्महत्या केली. केतकी गवांडे असे तिचे नाव आहे. या प्रकरणी दादर पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करत अधिक तपास सुरू केला आहे. गेल्या ७ वर्षांपासून केतकी मानसिक तणावाखाली होती. तिच्यावर मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचारही सुरू होते. याच मानसिक तणावामुळे तिने आत्महत्येचे पाऊल उचलले असावे, असा संशय पोलिसांना आहे.
केतकी कुटुंबासह प्रभादेवीच्या टिष्ट्वन टॉवरमध्ये राहत होती. सायकॉलॉजी विषयात एमए केलेल्या केतकीचे लग्न दोनच महिन्यांपूर्वी झाले होते. लग्नानंतर ती ताडदेव परिसरात राहू लागली. तिचे पती जाहिरात कंपनीत नोकरीला आहेत. ती रोज सकाळी आईकडे येत असे. त्यानंतर, संध्याकाळी ताडदेवला जात होती. गेल्या ७ वर्षांपासून ती मानसिक तणावाखाली होती, तिच्यावर उपचारही सुरू होते.
सोमवारी दुपारी ती नेहमीप्रमाणे प्रभादेवीच्या घरी आली. दुपारच्या सुमारास तिने इमारतीच्या २३व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. कुटुंबीयांना ही बाब समजताच, त्यांनी तिला सायन रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. दादर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. मानसिक तणावातूनच तिने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.