सत्तेची समीकरणे बदलणार

By Admin | Updated: October 7, 2014 00:14 IST2014-10-07T00:14:35+5:302014-10-07T00:14:35+5:30

रायगड जिल्ह्यात राजकीय वलय असणारे नेते हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच आहेत.

Power equations change | सत्तेची समीकरणे बदलणार

सत्तेची समीकरणे बदलणार

आविष्कार देसाई, अलिबाग
रायगड जिल्ह्यात राजकीय वलय असणारे नेते हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच आहेत. सत्तेचे छत्र सातत्याने आपल्या डोक्यावर ठेवण्यासाठी राजकीय समीकरणाची सूत्र लावून सत्तेची गणितं सोडविण्यात हातखंडा असणारे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि दुसरे शेकापचे धुरंदर नेते आमदार जयंत पाटील यापैकीच एक.
या दोन नेत्यांनी रायगडच्या राजकारणात नेहमीच खळबळ उडवून देत महाराष्ट्राचे लक्ष आपल्याकडे वेधले आहे. त्याचमुळे रायगडच्या राजकारणात काय घडते याचे कुतूहल नेहमीच महाराष्ट्राला लागलेले असतेच. सत्तेचे वलय सातत्याने आपल्याच भोवती फिरत राहावे यासाठी त्यांचा खटाटोप असतो. जयंत पाटील हे डाव्या विचारसरणीचे तर सुनील तटकरे हे पुरोगामी विचारांचे आहेत. त्यांची-त्यांची आपापल्या पक्षाशी बांधिलकी आहे. पाटील आणि तटकरे हे दोन स्वतंत्र सत्ता केंद्र असली, तरी जिल्ह्यावर दोघांपैकी एकच सत्ता आपल्या हाती ठेवू शकतो. त्यामुळेच त्यांच्या भूमिकेतही सतत बदल झालेला आहे, हे त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर नजर टाकल्यावर लक्षात येत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत शेकापने शिवसेनेसोबत असलेली युती संपुष्टात आणली आणि शेकापने स्वतंत्र उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविले. खासदार अनंत गीते हे आपल्याला भेटत नाहीत. हे युती तुटण्यामागचे कारण शेकाप नेते जयंत पाटील यांनी सांगितले होते. एवढ्या क्षुल्लक कारणावरुन युती तुटू शकते, यावर राजकीय विश्लेषकांही साशंक आहेत.
लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आघाडी झाली होती. आघाडीच्या माध्यमातून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनील तटकरे यांच्या वाट्याला आली होती. तटकरे यांच्यासमोर शिवसेना-भाजपा युतीचे अनंत गीते उभे होते. मोदी लाटेचा प्रभाव देशभर होता. त्यामुळे शिवसेनेला यशाची खात्री होती. मात्र लोकसभेच्या निवडणुकीत मदत करणारा शेकाप हा स्वतंत्र लढत होता. त्यामुळे लढाई सोपी नव्हती असे राजकीय जाणकार सांगतात.
शेकापने राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातील रमेश कदम या आयात केलेल्या उमेदवाराला उमेदवारी दिली. त्याचप्रमाणे मावळ मतदार संघातही लक्ष्मण जगताप यांना उभे केले. शेकापने आपल्याच पक्षातील सक्षम उमेदवार का दिले नाहीत, असाही प्रश्न पडतो. तटकरे यांना निवडणूक सोपी जावी यासाठीच शेकापची ही रणनीती होती, असा दावा राजकीय निरीक्षकांनी नोंदविला होता. यावेळी प्रचार सभांमधून दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर अत्यंत कठोर शब्दात टीका केली होती, हे विशेष आहे. भले हे दोन्ही नेते ते मान्य करीत नसतील परंतु वस्तुस्थिती तिच आहे. तटकरे हरले हे त्यांचे दुर्दैव परंतु रणनीती परफेक्टच होती. त्यानंतर रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पाटील आणि तटकरे पुन्हा सत्तेसाठी एकत्र आले. विधानसभेच्या निवडणुकीत लोकसभेचाच फॉर्म्युला अमलात येत आहे. जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदार संघात विशेष करुन अलिबाग, पेण, पनवेल आणि उरण या विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीने शेकापच्या विरोधात तुल्यबळ असणारे उमेदवार दिले नसल्याचे बोलले जाते तर, श्रीवर्धन आणि कर्जतमध्ये शेकापने सक्षम उमेदवार दिला नसल्याचे दिसून येते.

Web Title: Power equations change

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.