Join us  

वीज कंपन्या हाय अलर्ट मोडवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2020 4:59 PM

संभाव्य ब्लॅक आऊट टाळण्यासाठी पीओएसओसीओच्या सुचना : औष्णिक, जलविद्यूत आणि गॅस प्रकल्पांना तारेवरची कसरत

 

संदीप शिंदे 

मुंबई - पंतप्रधानांनी केलेल्या दीप प्रज्वलनाच्या आवाहनामुळे पावर ग्रीडमध्ये बिघाड होऊन देश अंधारत बुडू नये यासाठी केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या पावर सिस्टीम आॅपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडने (पीओएसओसीओ) वीज निर्मिती आणि वितरण व्यवस्थेसाठी कार्यप्रणाली ठरवून दिली आहे. त्यानुसार औष्णिक, जलविद्यूत आणि गॅसवर आधारीत प्रकल्पांमधून कधी आणि कशा पध्दतीने वीज निर्मिती करायची, त्याचे वितरण कसे करायचे, फ्रिक्वेन्सी कायम कशी ठेवायची याबाबत मार्गदर्शन केले आहे. ही सारी खबरदारी घेताना तारेवरची कसरतच करावी लागणार आहे. 

केंद्र सरकारच्या स्तरावर पावर ग्रीड, लोड डिस्पॅच सेंटर आणि अन्य संलग्न विभागातील अधिका-यांशी चर्चा केल्यानंतर या सुचना जारी झाल्याची माहिती महावितरणच्या एका वरिष्ठ अधिका-याने दिली. गेल्या रविवारी म्हणजेच २९ मार्च रोजी झालेल्या वीज वितरणाचा आधार घेत ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता वीज पुरवठ्यावर कसा परिणाम होईल याचा दोन पध्दतीने ताळेबंद पीओएसओसीओने मांडला आहे. २९ तारखेला संध्याकाळी ६ वाजून ७ मिनिटांनी देशातील विजेची मागणी १,०१ ,२०७ मेगावॅट होती. ९ वाजता ती १,१२,५५१ मेगावॅटपर्यंत पोहचली. त्यावरून या काळातील वाढता विजेचा वापर ११ हजार २०५ मेगावॅट होता. तेवढाच वीज वापर रविवारी ९ वाजता दिवे बंद केल्यानंतर कमी होईल असा अंदाज आहे. दुस-या मांडणीव्दारे वीज वापरात १२ हजार ८७९ मेगावॅट घट होईल असे निरिक्षण नोंदविण्यात आले आहे. त्यानुसार १२ ते १३ मेगावॅट वीज वापर अचानक कमी होईल असे गृहित धरून नियोजनाची कार्यप्रणाली ठरविण्यात आली आहे. त्यानुसार देशभरातील लोड डिस्पॅच सेंटर्स, वीज निर्मिती, पारेषण आणि वितरण करणा-या कंपन्यांसाठी सुचना जारी झाल्या आहेत. 

सर्व ठिकाणची घड्याळे भारतीय वेळेनुसार सेट करून घ्या असे सर्वप्रथम बजावण्यात आले आहे. ६ वाजून १० मिनिटांपासून ते ८ वाजेपर्यंत जलविद्यूत प्रकल्पांतील वीज निर्मिती कमी करून औष्णिक आणि गॅस प्रकल्पांतील निर्मिती वाढवा आणि मागणी पूर्ण करा. त्यानंतर ८ ते ८.५७ या काळात ही निर्मिती कमी करून जलविद्यूत प्रकल्पांची निर्मिती वाढवत जा. ८.५७ पासून पुन्हा जलविद्यूत आणि गॅस प्रकल्पांतील वीज निर्मिती फ्रिक्वेन्सी कायम राहिल याकडे लक्ष देत टप्प्याटप्प्याने कमी करावी. हे प्रकल्प पुर्ण बंद न करता त्यांच्या लघुत्तम निर्मिती क्षमतेपर्यंत चालू ठेवावेत. ९ वाजून ५ मिनिटांनी औष्णिक प्रकल्पांतील वीज निर्मिती वाढवत जावी. तसेच, ९ वाजून ९ मिनिटांनी पुन्हा जलविद्यूत प्रकल्पांतली निर्मिती वाढवून विजेची पूर्ववत झालेली मागणी पूर्ण करावी. त्यापुढे औष्णिक प्रकल्पांच्या माध्यमातून वीज पुरवठा सुरळीत झाल्यानंतर जलविद्यूत प्रकल्प बंद करावे असे निर्देश देण्यात आले आहेत. दिवे बंद झाल्यानंतर फ्रिक्वेन्सीत अचानक वाढ होण्याची शक्यता गृहित धरून रात्री ८.३० पासूनच ही फ्रिक्वेन्सी लघूत्तम म्हणजेच ४९.९० इतकी ठेवावी असेही स्पष्ट करण्यात आले आहे. 

सोसायट्यांनी मेन स्वीच बंद करू नयेरविवारी रात्री अनेक ठिकाणच्या सोसायट्यांमध्ये वीज पुरवठ्याच्या मुख्य प्रवाहच बंद केला जाण्याची भीती आहे. त्यामुळे यंत्रणांवर ताण पडून बिघाड होऊ शकतो. सोसायट्यांनी अशा पध्दतीने पुरवठा बंद करू नये असे आवाहन करण्यात आले आहे. पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनानुसार केवळ घरातील दिवे बंद करा. पंखा, फ्रिज, टीव्ही यांसारखी अन्य उपकरणे किंवा घरातला संपुर्ण वीज पुरवठा बंद करू नका अशा सुचनाही देण्यात आल्या आहेत. 

सर्व अधिकारी कार्यालयातया दीप प्रज्वलन मोहिमेतला संभाव्य गोंधळ टाळण्यासाठी सर्व वरिष्ठ अधिका-यांनी संध्याकाळी ६ ते रात्री १० या वेळेत कार्यालयांमध्ये उपस्थित रहावे. सर्व वीज कंपन्यांमधिल कर्मचा-यांची दुपारची शिफ्ट रात्री १० पर्यंत वाढवावी. स्काडावरील डेटा प्रत्येक सेकंदाला अद्ययावत ठेवावा. फिडस स्विचिंगची कामे ८ ते ९ या काळात हाती घेऊ नयेत. कॅपेसिटर्स व्होल्टेंज कंट्रोल मोडवर ठेवावेत, सर्व रिअ‍ॅक्टर्स रात्री ८ पासून कार्यरत असतील याची काळजी घ्यावी. तसेच, आपत्कालीन परिस्थितीतली सुरक्षा व्यवस्था यंत्रणाही सतर्क ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

टॅग्स :भारनियमनकोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस