Join us  

४८ तासांच्‍या आत बुजणार रस्त्यावरचा खड्डा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2020 1:02 PM

नागरिकांना खड्डे विषयक तक्रार करता यावी, यासाठी महापालिकेने तक्रार करण्‍याची सुविधा उपलब्‍ध करुन दिली आहे.

ठळक मुद्देमुंबई महापालिकेच्या अखत्‍यारित २ हजार ५५ किलोमीटर लांबीचे रस्‍ते  महापालिकेच्‍या portal.mcgm.gov.in या संकेतस्‍थळावर देखील खड्डेविषयक तक्रार नोंदविता येऊ शकते.खड्डेविषयक बाबींच्‍या सुव्‍यवस्‍थापनासाठी www.mybmcpotholefixit.com हे एक स्‍वतंत्र संकेतस्‍थळ सुरु केले आहे.

मुंबई : पावसाळ्या दरम्‍यान रस्त्यावर खड्डे उद्भवल्‍यास ते भरण्‍याची कार्यवाही लवकरात-लवकर करता यावी, यादृष्‍टीने नागरिकांना खड्डे विषयक तक्रार करता यावी, यासाठी महापालिकेने पारंपारिक पद्धतीने लेखी तक्रार करण्‍यासह अत्‍याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन तक्रार करण्‍याची सुविधा नागरिकांना उपलब्‍ध करुन दिली आहे. या अंतर्गत प्रामुख्‍याने भ्रमणध्‍वनी ऍपद्वारे तक्रार करणे, संकेतस्‍थळाद्वारे तक्रार करणे, दूरध्‍वनीद्वारे तक्रार करणे, ट्वीटरद्वारे तक्रार यासारख्‍या विविध पर्यांयाचा समावेश आहे. या पर्यांयाचा वापर करुन तक्रार केल्‍यानंतर साधारणपणे ४८ तासांच्‍या आत संबंधित अभियंत्‍याद्वारे व कंत्राटदाराद्वारे खड्डे भरण्‍याची कार्यवाही केली जाते. तसेच आवश्‍यक ती कार्यवाही ४८ तासांच्‍या आत न झाल्‍यास संबंधीतांवर दंड आकारणी केली जाते.

रस्‍त्‍यांबाबत काही तक्रार करावयाची असल्‍यास ती नागरिकांना सहजपणे करता यावी, यासाठी अत्‍याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन MyBMC Pothole FixIt ही विशेष भ्रमणध्‍वनी आधारित ऍप तयार केले आहे. भ्रमणध्‍वनीतील जीपीएस / लोकेशेन ऑन करुन रस्‍त्‍यावरील खड्डय़ाचा फोटो काढल्‍यास व तो फोटो त्‍याच ठिकाणाच्‍या जवळून ऍपमध्‍ये अपलोड केल्‍यास संबंधित ठिकाणाच्‍या नकाशासह अपलोड होतो. ज्‍यामुळे रस्‍त्‍यावर नक्‍की कोणत्‍या ठिकाणी खड्डा आहे? या विषयीची निश्चित माहिती उपलब्‍ध होऊन खड्डे भरण्‍याची कार्यवाही अधिकाधिक लवकर करणे शक्‍य होते. या ऍपमध्‍ये एकदा तक्रार दाखल केल्‍यानंतर तक्रारदारास एक विशिष्‍ट तक्रार क्रमांक प्राप्‍त होतो. या तक्रार क्रमांकाच्‍या आधारे ऍपमध्‍ये सर्च केल्‍यास सदर तक्रारीच्‍या अनुषंगाने सद्यस्थितीची माहिती तक्रारदारास लगेच दिसू शकते. तक्रार प्राप्‍त झाल्‍यानंतर महापालिकेच्‍या संबंधित अभियंता / कंत्राटदाराद्वारे खड्डा भरण्‍याची व रस्‍ता सुव्‍यवस्थित करण्‍याची कार्यवाही केल्‍यानंतर त्‍या ठिकाणचा सुधारित फोटो ऍपमध्‍ये अपडेट केला जातो.  ज्‍यामुळे तक्रारदारास त्‍याने केलेल्‍या तक्रारीचे निराकरण झाल्‍याची खात्रीशीर माहिती मिळते. खड्डय़ांविषयीच्‍या तक्रारींसाठी महापालिकेने कार्यान्वित केलेल्‍या या ऍपमुळे नागरिकांना खड्डेविषयक तक्रारी करणे अधिक सुलभ झाले आहे.

............................

प्राधिकरणाच्या अखत्‍यारित- मुंबईतील २५.३३ किलोमीटर लांबीचा पश्चिम द्रुतगती महामार्ग- २५.५५ किलोमीटर लांबीचा पूर्व द्रुतगती महामार्ग- वांद्रे-कुर्ला संकुल परिसरातील रस्‍ते

............................

- रस्‍त्‍यांवरील खड्डे विषयक किंवा खराब पट्टय़ाविषयक तक्रार करावयाची असल्‍यास ती १९१६ या दूरध्‍वनी क्रमांकावर करता येईल.- १८००-२२-१२-९३ या टोल फ्री क्रमांकावर खड्डेविषयक तक्रारी स्‍वीकारण्‍यात येत आहेत.- महापालिकेच्‍या @mybmc या व्‍ट‍िटर अकाऊंटला टॅग करुन नागरिक खड्डेविषयक तक्रार करु शकतात.- रस्‍ता ज्‍या प्रशासकीय विभागातील अभियंत्‍यांना थेट दूरध्‍वनी करुन नागरिक आपली तक्रार नोंदवू शकतात.

............................

 

टॅग्स :खड्डेरस्ते वाहतूकमुंबई