पावसाळ्यापूर्वी खड्ड्यांची दुरुस्ती !
By Admin | Updated: May 13, 2015 23:52 IST2015-05-13T23:52:10+5:302015-05-13T23:52:10+5:30
पनवेल ते इंदापूर या रायगड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांची दुरुस्ती तातडीने करण्यात यावी आणि पावसाळ्यापूर्वी रस्ते

पावसाळ्यापूर्वी खड्ड्यांची दुरुस्ती !
अलिबाग : पनवेल ते इंदापूर या रायगड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांची दुरुस्ती तातडीने करण्यात यावी आणि पावसाळ्यापूर्वी रस्ते वाहतुकीसाठी सुव्यवस्थित करावेत, असे आदेश जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना मंगळवारी दिले.
आगामी पावसाळा तसेच आपत्ती व्यवस्थापन या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. बैठकीस अपर जिल्हाधिकारी प्रवीण शिंदे, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) तथा पेण प्रांत किरण पाणबुडे, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अभियंता प्रशांत फेगडे यांच्यासह पनवेल तहसीलदार पवन चांडक, पेण तहसीलदार सुकेशिनी पगारे, रोहा तहसीलदार उर्मिला पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
महामार्गावरील कामे तातडीने पूर्ण करावीत. तसेच आपत्ती काळात महामार्गावर प्रवाशांना वैद्यकीय सुविधा मिळतील, यासाठी अॅम्ब्युलन्स सेवा विविध ठिकाणी उपलब्ध ठेवावी, वाहनचालकांना मार्गदर्शक बोर्ड, स्टिकर्स, होर्डिंग लावावेत, पावसामुळे येणाऱ्या अडचणी, ड्रेनेज आदींबाबतही तातडीने दखल घेऊन कार्यवाही करावी, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित यंत्रणेला यावेळी दिले. तसेच तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम, पोलीस अधिकारी आदींच्या मार्फत या रस्त्याची पाहणी करण्यात येणार आहे. सर्व संबंधित विभागांनी आपापल्या हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग संदर्भात तातडीने कार्यवाही करावी, असेही या बैठकीत सांगण्यात आले. (प्रतिनिधी)