राष्ट्रीय महामार्गावरील बुजविले खड्डे
By Admin | Updated: July 16, 2015 22:55 IST2015-07-16T22:55:45+5:302015-07-16T22:55:45+5:30
राष्ट्रीय महामार्ग क्र. १७ चे पळस्पे ते इंदापूरपर्यंत ८४ किमी रस्ता रुंदीकरणाचे काम गेली दोन वर्षे सुरू आहे. मात्र दरवर्षी मान्सून हंगामात होणाऱ्या अतिवृष्टीने

राष्ट्रीय महामार्गावरील बुजविले खड्डे
पेण : राष्ट्रीय महामार्ग क्र. १७ चे पळस्पे ते इंदापूरपर्यंत ८४ किमी रस्ता रुंदीकरणाचे काम गेली दोन वर्षे सुरू आहे. मात्र दरवर्षी मान्सून हंगामात होणाऱ्या अतिवृष्टीने महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य दिसू लागते.
यंदा जूनवगळता जुलैच्या पंधरवड्यात पावसाने दडी मारली. मात्र पावसाअभावी महामार्गावर या वर्षी खड्ड्यांचे प्रमाण कमी दिसत असून जे काही खड्डे महामार्गावर पडलेले होते ते बुजविण्याचे काम ठेकेदार कंपनीतर्फे सुरू असून पेण ते वडखळ या ६ किमी अंतरावरील रस्त्यावरचे खड्डे बुजविण्यात आले आहेत.
कोकणातील चाकरमान्यांना गणेशोत्सवासाठी याच मुंबई-गोवा महामार्गावरून मोठ्या प्रमाणात प्रवास करावा लागतो. गणेशोत्सवात ६५ दिवसांचा अवधी शेष असताना दरवर्षी येतो पावसाळा आणि रस्त्यावरचे खड्डे पटापट भरा, असा फतवा शासनातर्फे निघतो.
गेली दोन वर्षे विरोधी पक्षनेते म्हणून विनोद तावडे यांनी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाची जातीने पाहणी करून गणेशोत्सव काळात राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे, साइडपट्ट्या, दिशादर्शक फलक, वळणावरील साइडपट्ट्यांचे भराव याबाबत तत्कालीन आघाडी सरकारला धारेवर धरून महामार्गाचे काम करून घेतले होते. आता राज्याच्या सत्तेचा सारिपाट बदलला आहे. भाजपा - शिवसेना पक्षांचे सरकार आहे आणि विशेष म्हणजे रस्त्यांच्या खड्ड्यांवरून आकांडतांडव करणारे विनोद तावडे भाजपा, रामदास कदम शिवसेना हे कोकणचे दोन नेते मंत्रिमंडळात महत्त्वाच्या पदावर आहेत.
गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक खड्डे विरहित, प्रवास निर्विघ्न व्हावा व विरोधकांना याची संधी मिळू नये, यासाठी सत्तास्थानी असलेल्यांनी कोकणच्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुंबई-गोवा महामार्गावरचे खड्डे बुजविण्याचे फर्मान काढलेले आहे.
रायगड जिल्हाधिकारी शीतल उगले यांनी ३१ जुलैपूर्वी महामार्गावरचे खड्डे बुजविण्याचे आदेश दिल्याने महामार्गाचे काम करणारे ठेकेदार कंपनी महावीर इन्फ्राक्ट्रक्चरतर्फे पेण ते वडखळ या दरम्यानच्या ६ किमी अंतरावरील खड्डे बुजविण्याचे काम बहुतांशी पूर्ण करण्यात आले आहे.