रोह्यात ‘पोस्टर बॉईज’चा धुमाकूळ

By Admin | Updated: May 18, 2015 03:50 IST2015-05-18T03:50:55+5:302015-05-18T03:50:55+5:30

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रोहा नगरपरिषदेने परिपत्रक काढून बॅनर, फ्लेक्स, पोस्टर लावण्याबाबत नियमावली आखून दिली होती.

The poster boys' rage in Roha | रोह्यात ‘पोस्टर बॉईज’चा धुमाकूळ

रोह्यात ‘पोस्टर बॉईज’चा धुमाकूळ

रोहा : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रोहा नगरपरिषदेने परिपत्रक काढून बॅनर, फ्लेक्स, पोस्टर लावण्याबाबत नियमावली आखून दिली होती. परंतुु सदर नियमावलीचा नगरपालिका प्रशासनालाच विसर पडल्याने रोह्यात पुन्हा पोस्टर बॉईजचा धुमाकूळ चौकाचौकांतून दिसून येत आहे. यामुळे आपण जबाबदार नागरिक असूनही न्यायालयीन आदेश धाब्यावर बसवत आहोत, याची जाणीव या पोस्टर बॉईजना असल्याची दिसून येत नाही.
नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने सरकारी जाहिरातीवर पंतप्रधान, राष्ट्रपती, सरन्यायाधीश केवळ यांचेच फोटो असावेत, असे निर्देश दिले आहेत. रोहा नगरपरिषदेने पाठविलेल्या पोस्टर संदर्भातील नियमावलीमध्ये संबंधित पोस्टर लावणाऱ्यांचे नाव, किती कालावधीसाठी व कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत पोस्टर लावणार याची माहिती संबंधित पोस्टरवर लिहिणे बंधनकारक असल्याचे नमूद केले आहे. तसेच प्रतिपोस्टर असणारी फी भरल्याशिवाय पोस्टर लावता येणार नाही, असे नमूद केले आहे. तरीही रोह्यात कोणीही उठावे आणि आपले पोस्टर लावावे, असा पायंडा पडत आहे. नेते सुनील तटकरे यांची राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर रोहा शहरात त्यांना शुभेच्छा देणारा एकही फलक उभारण्यात आला नाही. परंतु चमकेगिरी करण्याची सवय लागलेल्या पोस्टर बॉईजना शहराच्या सौंदर्याशी व वाहतुकीला होणाऱ्या अडचणीबाबत काहीही देणे-घेणे नसल्याने जिथे जागा मिळेल तिथे पोस्टर बॉईज स्वत:ला लटकवून घेत आहेत.
पोस्टरवर लिहिल्या जाणाऱ्या विविध मजकुरांमुळे रोहेकरांना हसावे की रडावे हेच कळत नाही. रोहेकरांच्या मूलभूत प्रश्नांवर आवाज उठविण्यास कोणीही तयार नाही. परंतु विविध रंगातील, भावमुद्रेतील आणि ढंगातील आपले छायाचित्र लावण्यात पोस्टर बॉईज स्वत:ला धन्य मानत आहेत. ज्यांचे समाजाप्रति कोणतेही योगदान नाही, अशा व्यक्तीचे देखील वाढदिवस, श्रध्दांजलीच्या नावाखाली पोस्टर्स उभारली जातात. ज्यांचा रोहा शहराशी कोणताही संबंध नाही अशी मंडळीही रोह्यात पोस्टर बॉईज म्हणून मिरवताना दिसत आहेत. या पोस्टर बॉईजमुळे रोहा नगरपरिषदेच्या उत्पन्नात भर पडणार नाही. मग नगरपरिषदेच्या उत्पन्नात भर पडणार नसल्यास रोहेकरांनी या पोस्टर बॉईजना का पाहावे? असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: The poster boys' rage in Roha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.