जिल्हाप्रमुख पदावरून शिवसेनेत गोंधळनामा
By Admin | Updated: August 19, 2014 23:41 IST2014-08-19T23:26:52+5:302014-08-19T23:41:59+5:30
गटबाजीचे प्रदर्शन : सुतार गटाकडून पक्षप्रमुखांकडे साकडे

जिल्हाप्रमुख पदावरून शिवसेनेत गोंधळनामा
सांगली : जिल्हाप्रमुख पदावरून संदीप सुतार यांची उचलबांगडी झाल्यानंतर सुतार यांचा मोजक्याच कार्यकर्त्यांचा एक गट मुंबईत पक्षप्रमुखांच्या भेटीला गेला आहे. विधानसभा निवडणुकीपर्यंत बदल करू नयेत, म्हणून त्यांनी नेत्यांना साकडे घातल्याचे समजते. दुसरीकडे नवे जिल्हाप्रमुख म्हणून विकास सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली असली तरी, त्याबाबतची घोषणा अद्याप केलेली नाही. त्यामुळे जिल्हाप्रमुख पदावर शिवसेनेत गोंधळ निर्माण झाला आहे.
सांगली जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून शिवसेनेत पद नियुक्तीचा गोंधळ सुरू आहे. आता पुन्हा जिल्हाप्रमुख पदावरून गटबाजीचे दर्शन घडविले जात आहे. पदावरून उचलबांगडी झाल्याचे वृत्त समजताच संदीप सुतार आपल्या मोजक्याच समर्थकांना घेऊन मंगळवारी मुंबईला गेले. त्याठिकाणी त्यांनी पक्षप्रमुखांची भेट घेऊन, विधानसभेपर्यंत पदावर राहण्याची संधी मिळावी, अशी विनंती केल्याचे समजते. या भेटीबाबतचा अधिक तपशील समजू शकला नाही. तरीही विकास सूर्यवंशी यांना जिल्हाप्रमुख करण्याऐवजी सांगलीच्या अजिंक्य पाटील यांची निवड करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता पक्षप्रमुख या विषयावर कोणता निर्णय घेणार, याविषयीची उत्सुकता शिवसैनिकांना लागली आहे.
सांगली जिल्ह्यात शिवसेनेत अनेक गट-तट आहेत. एकसूत्रता नसल्यानेच गेल्या काही वर्षात पक्षाला स्वत:चे अस्तित्व निर्माण करता आलेले नाही. आगामी विधानसभा निवडणुकीत अस्तित्व निर्माण करण्यासाठी पदाधिकारी बदलाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून रविवारी मुंबईत सुतार यांच्याजागी मिरजेचे विकास सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली. त्याठिकाणी त्यांचा सत्कार करण्यात आला. मात्र कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. दुसरीकडे सुतार यांच्या गटाने सूर्यवंशी किंवा अन्य कोणालाही या पदावर बसविण्यास विरोध केल्याची चर्चा आहे. त्यामुळे या पदाच्या निमित्ताने शिवसेनेत पुन्हा गटबाजी उफाळली आहे. एकीकडे पक्षात राष्ट्रवादीचे नेते प्रवेश करीत असताना, शिवसेनेचा गृहकलह आता नेत्यांसाठी डोकेदुखी ठरणार आहे. (प्रतिनिधी)