काँग्रेसमध्ये वादळाची शक्यता
By Admin | Updated: October 18, 2014 00:10 IST2014-10-18T00:10:09+5:302014-10-18T00:10:09+5:30
विधानसभा निवडणूक निकालानंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद मोठय़ा प्रमाणात उफाळून येण्याची शक्यता असून प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना बदलण्याची मागणी आतापासूनच होऊ लागली आहे.

काँग्रेसमध्ये वादळाची शक्यता
मुंबई : विधानसभा निवडणूक निकालानंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद मोठय़ा प्रमाणात उफाळून येण्याची शक्यता असून प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना बदलण्याची मागणी आतापासूनच होऊ लागली आहे.
ऐन मतदानाच्या पूर्वसंध्येला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे आणि अशोक चव्हाण या दोन माजी मुख्यमंत्र्यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्याने पक्षात प्रचंड नाराजीचा सूर उमटला. चव्हणांचे वक्तव्य अनाठायी होते, अशी टीका नारायण राणो व प्रदेशाध्यक्ष ठाकरे यांनी केली आहे. काहींनी तर थेट पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे याबाबत तक्रार केल्याचे समजते.
चंद्रपूरचे माजी खासदार नरेश पुगलिया यांनी आज पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह प्रभारी मोहन प्रकाश आणि प्रदेशाध्यक्ष ठाकरे यांच्यावर तोफ डागली. ते म्हणाले, या तिघांना लोकसभा निवडणुकीपूर्वीच हटवायला हवे होते. सावनेरचे आमदार सुनील केदार यांनीही आज पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका केली. चिमूरचे आमदार विजय वडेट्टीवार यांना ब्रrापुरीला पाठविण्याचे काहीही कारण नव्हते. सिरोंचाच्या सगुणा तलांडी यांना गडचिरोलीतून तिकिट देण्यामागचा हेतूच आम्हाला समजला नाही, असे माजी खासदार मारोतराव कोवासे म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)