राजकारणातही नव्या वादळाची शक्यता!
By Admin | Updated: January 1, 2015 01:44 IST2015-01-01T01:44:08+5:302015-01-01T01:44:08+5:30
नवीन वर्षात दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यावर चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.

राजकारणातही नव्या वादळाची शक्यता!
मुंबई : नवीन वर्षात दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यावर चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. ‘बाळकडू’ हा बाळासाहेबांवरील चित्रपट २३ जानेवारी रोजी त्यांच्या जयंतीदिनी प्रदर्शित होत आहे तर मुंडे यांच्यावरील चित्रपट ११ डिसेंबर २०१५ रोजी त्यांच्या जयंती दिनाच्या पूर्वसंध्येला रिलीज होणार आहे.
हे दोन्ही नेते लोकप्रिय होते तसेच त्यांच्याशी अनेक वाद जोडलेले असल्याने त्यांच्यावरील चित्रपट सांस्कृतिक विश्वाबरोबरच राजकीय विश्वातही वादळ निर्माण करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील ‘बाळकडू’ चित्रपटाचे निर्माते खासदार संजय राऊत आहेत. या चित्रपटात उमेश कामत, नेहा पेंडसे यांच्या भूमिका आहेत. याखेरीज बाळासाहेबांची प्रमुख व्यक्तीरेखा आहे. मात्र ही व्यक्तीरेखा कुणी साकारली त्याबाबत गुप्तता बाळगण्यात आली आहे. अतुल काळे हे चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. मराठी अस्मितेचा हुंकार हा चित्रपटाचा केंद्रबिंदू असल्याचे कळते. गेल्या काही दिवसांत विशेष करून भाजपा-शिवसेनेतील विसंवाद वाढल्यावर संजय राऊत यांनी मराठी अस्मितेची आक्रमक भूमिका घेतली होती. त्याचवेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मवाळ भूमिका घेतली. शिवसेनेच्या मुखपत्रातील भूमिकेशी असहमती व्यक्त केली गेली. त्यामुळे राऊत यांचे हे ‘बाळकडू’ शिवसेनेत चर्चेचा व औत्सुक्याचा विषय ठरला आहे.
गोपीनाथ मुंडे यांच्यावरील चित्रपटाची निर्मिती भाजपा चित्रपट युनियन करीत आहे. युनियनचे अध्यक्ष संदीप घुगे व भाजपा प्रदेश सहकार्यालय मंत्री मुकुंद कुलकर्णी हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. फेब्रुवारी महिन्यात चित्रपटाचे चित्रिकरण सुरु करून ११ डिसेंबर २०१५ रोजी रिलीज करण्याचा निर्धार आहे. मुंडे यांच्या भूमिकेकरिता व अन्य कलाकारांच्या निवडीकरिता सध्या मराठी व हिंदी चित्रपट क्षेत्रातील कलाकारांशी चर्चा सुरु आहे. मुंडे यांनी १९७१ साली महाविद्यालयात प्रवेश केल्यापासून २०१४ साली त्यांचे अपघाती निधन होईपर्यंतचा घटनाक्रम मांडण्यात येणार आहे. चार ते पाच कोटी रुपये खर्च करून हा चित्रपट तयार केला जाणार आहे. मुंडे हेही लोकप्रिय नेते होते तसेच वादळी व्यक्तीमत्व होते. (विशेष प्र्रतिनिधी)
प्रमोद महाजन यांची भावाकडून झालेली हत्या, त्यानंतर मुंडे यांचा नेत्यांबरोबरचा संघर्ष व आता केंद्रीय मंत्रिमंडळातील त्यांचा प्रवेशही संघर्षानंतर झाला होता. अशा काही बाबींवर या चित्रपटात कसे भाष्य केले जाते, याकडे भाजपातील अनेकांचे लक्ष लागले आहे.