मुद्रांक शुल्कात २ ते ३ टक्के सूट मिळण्याची शक्यता, घर घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांना फायदा
By अतुल कुलकर्णी | Updated: August 18, 2020 05:35 IST2020-08-18T05:35:10+5:302020-08-18T05:35:23+5:30
डिसेंबरपर्यंत मुद्रांक शुल्कामध्ये (स्टॅम्प ड्युटी) ३ टक्के तर जानेवारी ते मार्च या तीन महिन्यासाठी २ टक्के सूट देण्याचा प्रस्ताव महसूल विभागाने तयार केला आहे.

मुद्रांक शुल्कात २ ते ३ टक्के सूट मिळण्याची शक्यता, घर घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांना फायदा
अतुल कुलकर्णी
मुंबई : मुद्रांक शुल्क आणि नोंदणी फी मधून राज्याला मिळणाºया महसुलात लॉकडाऊनमुळे एप्रिल ते जुलै या चार महिन्यांत तब्बल ६,८३८.७९ कोटी रुपयांचा फटका बसला. त्यामुळे बांधकाम व्यवसायाला गती देण्यासाठी डिसेंबरपर्यंत मुद्रांक शुल्कामध्ये (स्टॅम्प ड्युटी) ३ टक्के तर जानेवारी ते मार्च या तीन महिन्यासाठी २ टक्के सूट देण्याचा प्रस्ताव महसूल विभागाने तयार केला आहे. मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर निर्णय होण्याची शक्यता आहे.
याबाबत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी 'लोकमत'ला सांगितले, सरसकट मुद्रांक शुल्क कमी करणे अथवा त्यात बदल करणे योग्य होणार नाही. मात्र बांधकाम व्यवसायाला गती देण्याकरता काही ठोस निर्णय घेण्यात येत आहेत. यामुळे घरांच्या खरेदी विक्रीला चालना मिळेल. २०१९-२० मध्ये नोंदणी झालेल्या सदनिकांच्या खरेदी-विक्रीतून सरकारला १३,३०४.४२ कोटी महसूल मिळाला होता. मात्र एप्रिल ते जुलै या चार महिन्यात लॉकडाऊन असल्यामुळे महसुलात घट होऊन ३२५८.६० कोटी एवढाच झाला. त्यामुळे मुद्रांक शुल्कात सूट देण्याचा विचार आहे.
>दिलासा देण्याचा विचार
स्टॅम्प ड्युटी अॅडजेस्टमेंटसाठीचा कालावधी एक वर्ष ऐवजी तीन वर्ष करावा, अशी मागणी बांधकाम व्यावसायिकांनी केली आहे. मात्र तीन वर्षाच्या ऐवजी दोन वर्षाची मुदत देण्याचा विचार महसूल विभाग करत आहे. तसेच भागीदार किंवा कुटुंबातील सदस्य भागीदार असलेल्या अमलगमेशन, मर्जर, डिमर्जर आणि रिकन्स्ट्रक्शन आॅफ कंपनीज यासाठी स्टॅम्प ड्युटी दहा लाख करण्याबाबत देखील महसूल विभाग विचार करत आहे.
>खरेदीदारांना अशी मिळेल सवलत
सध्या ५ टक्के स्टॅम्प ड्युटी आकारली जाते. डिसेंबर पर्यंत ती २ टक्के असेल तर
जानेवारी ते मार्च या काळात ती ३ टक्के असेल. नव्या आर्थिक वर्षात परिस्थिती पाहून निर्णय घेतले जातील, असे महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.