Join us

अ‍ॅप बेस्ड टॅक्सी चालक-मालकांचा संप आज मागे घेतला जाण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2018 06:46 IST

आठ दिवसांपासून वेठीस धरलेल्या मुंबईकरांना मंगळवारी सकाळीदेखील पर्यायी वाहतूक व्यवस्थेने कार्यालय गाठावे लागणार आहे.

मुंबई : आठ दिवसांपासून वेठीस धरलेल्या मुंबईकरांना मंगळवारी सकाळीदेखील पर्यायी वाहतूक व्यवस्थेने कार्यालय गाठावे लागणार आहे. सोमवारी आठ तासांहून अधिक काळ झालेल्या बैठकीत अ‍ॅप बेस्ड टॅक्सी चालक-मालकांच्या सुमारे ८० टक्के मागण्या मान्य झाल्या आहेत. मात्र अ‍ॅप बेस्ड टॅक्सी चालक-मालकांच्या अन्य प्रश्नांबाबत परिवहन आयुक्तांच्या बैठकीनंतर संपाबाबत भूमिका ठरवण्यात येणार आहे. यामुळे मंगळवारी सकाळी अ‍ॅप बेस्ड टॅक्सी प्रवाशांसाठी ‘आॅफलाइन’ राहणार असल्याचे स्पष्ट होत आहे.शहरातील ओला-उबर व्यवस्थापनाच्या मनमानी कारभारामुळे गेल्या सोमवारपासून महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाने संपाची हाक दिली होती. संपावर तोडगा काढण्यासाठी संघाचे अधिकारी आणि ओला-उबर व्यवस्थापनाचे प्रतिनिधी यांच्यात सोमवारी दुपारी सुरू झालेली बैठक रात्री संपली. सुमारे ८ तास झालेल्या बैठकीनुसार, अ‍ॅप बेस्ड टॅक्सी चालक-मालकांना प्रति किलोमीटर दरात अनुक्रमे १२, १५ आणि १९ रुपयांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रति किलोमीटरमागे आता या कंपन्यांकडून कमिशन आकारण्यात येणार नाही. पूर्वी चालक-वाहकांना अनुक्रमे ६, ७ आणि ८ रुपये प्रति किलोमीटर मिळत होते. त्याचबरोबर कंपनीने ‘लीज कॅब’ न घेण्याबाबतची मागणीदेखील मान्य केली आहे. या आणि अशा सुमारे ८०% मागण्या ओला-उबर व्यवस्थापनाने मान्य केल्याचे संघाचे सचिव आणि वाहतूक विभाग प्रमुख सुनील बोरकर यांनी सांगितले....तर आंदोलन कायमपरिवहन आयुक्त शेखर चन्ने यांची संघाचे अध्यक्ष सचिन अहिर हे भेट घेणार आहेत. त्यावेळी अ‍ॅप बेस्ड टॅक्सी चालकांच्या अन्य समस्यांबाबत चर्चा करण्यात येईल. त्यानंतर संपाबाबत योग्य निर्णय घेणार असल्याचे बोरकर म्हणाले. परिणामी, २२ आॅक्टोबरपासून सुरू असलेले आंदोलन मंगळवारी पहिल्या सत्रात कायम राहणार आहे.

टॅग्स :ओलाउबर