खुल्या डीपींमुळे अपघातांची शक्यता
By Admin | Updated: June 27, 2015 22:55 IST2015-06-27T22:55:00+5:302015-06-27T22:55:00+5:30
शहरातील अनेक डीपी गंजल्या असून त्यातील वीज वाहिन्याही खुल्याच ठेवण्यात आहेत. सध्या पावसामुळे विजेचा लपंडाव सुरू असून वीजप्रवाह

खुल्या डीपींमुळे अपघातांची शक्यता
कळंबोली : शहरातील अनेक डीपी गंजल्या असून त्यातील वीज वाहिन्याही खुल्याच ठेवण्यात आहेत. सध्या पावसामुळे विजेचा लपंडाव सुरू असून वीजप्रवाह अनियमित दाबाने होत असल्याने अपघातांची शक्यता निर्माण झाली आहे. तरी शहरातील जुनाट, गंजलेल्या डीपींची दुरुस्ती करावी आणि त्या खुल्या ठेवू नयेत, अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत.
कळंबोलीत अनेक मूलभूत व पायाभूत सुविधांचा अभाव असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. महावितरणकडून शहरात ठिकठिकाणी बसवण्यात आलेल्या डीपींची योग्य देखभाल दुरुस्ती होत नाही. अनेक ठिकाणी डीपींलगत वीज वाहिन्या लटकताना दिसतात. बहुतांश डीपींना गंज लागला असून त्यांचे दरवाजे निखळले आहेत. त्यामुळे पावसाळ्यात अपघातांचा धोका अधिक संभवतो. काही डीपींमध्ये वारंवार शॉर्टसर्किट होत असून याबाबत महावितरण कार्यालयात कळवण्यात आले आहे. मात्र तरीही दुरुस्ती होत नसल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.
बहुतांश डीपी इमारती तसेच बाजारात रहदारीच्या ठिकाणी असल्याने नागरिकांच्या जीवास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. येथील शिवमंदिराच्या पाठीमागे सेक्टर-४ येथे सिडकोचा होल्डिंग पाँड असून या ठिकाणी महावितरणचे रोहित्र आहे. येथूनच पाणी काढणाऱ्या पंप हाऊसकरिता वीजपुरवठा केला जातो. मात्र डीपी खुली असल्याने फ्युज उडून वीजपुरवठा खंडित होत असल्याचे येथील शिवसेनेचे उपशाखाप्रमुख आत्माराम कदम यांनी सांगितले.
याठिकाणी नव्याने नियुक्ती झाली आहे. कळंबोलीतील शिवसेना व भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मागणीवरून परिसरातील डीपींची पाहणी करून दुरुस्ती केली जाईल. शिवाय डीपींना दरवाजेही बसवण्यात येतील.
- ए. व्ही. पवार,
सहाय्यक अभियंता, वीज वितरण कळंबोली.