Join us
Daily Top 2Weekly Top 5

भररस्त्यात तरुणीसमवेत अश्लील चाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 01:55 IST

मैत्रिणीसोबत चित्रपट पाहून दोघीही स्कुटीवरून घरी निघाल्या.

मुंबई : मैत्रिणीसोबत चित्रपट पाहून दोघीही स्कुटीवरून घरी निघाल्या. त्याच दरम्यान दोन तरुणांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. त्यांना पाहून दोघेही टिंगलटवाळी करू लागले. मैत्रिणीने याबाबत पोलीस नियंत्रण कक्षास कॉल करून माहिती दिली. काही अंतर पुढे आल्यानंतर, तरुणीने स्कुटी थांबवून जाब विचारला. तेव्हा, ‘मुझे तुमसे बात करनी है...’ असे सांगून दुचाकीस्वार कॉलेज तरुणांनी तिच्याजवळ जात अश्लील चाळे केल्याची धक्कादायक घटना चर्चगेट परिसरात घडली. तरुणीने ओरडण्यास सुरुवात करताच, घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी दोघांना अटक केली.येथील व्ही.पी. रोड परिसरात २२ वर्षीय तक्रारदार तरुणी राहते. बुधवारी रात्री मैत्रिणीसोबत चित्रपट पाहून ती ८च्या सुमारास बाहेर पडली. त्याच दरम्यान त्यांचे मागे चित्रपटगहात बसलेले दोन तरुणही बाहेर पडले. स्कुटीवरून त्या घरी निघाल्या. तेव्हा दोघांनी तरुणींचा पाठलाग सुरू केला. त्यांना पाहून ते अश्लील टिप्पणी करू लागले.सुरुवातीला रोडरोमियोंच्या नादी कशाला लागायचे, म्हणून त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, बराच वेळ पाठलाग सुरू असल्याने त्यांनी पोलीस नियंत्रण कक्षास याबाबत कळविले.हा प्रकार असह्य झाल्याने त्यांनी चर्चगेट परिसरात स्कुटी थांबविली. तेही थांबले. तरुणीने त्यांच्याकडे जाब विचारला, तेव्हा ‘बात करनी है’ असे सांगत तरुणीसोबत अश्लील चाळे केले. तरुणीने ओरडण्यास सुरुवात करताच, नागरिक तेथे जमले. पोलीसही दाखल झाले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात आणले.तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून दोघांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार, दोघांनाही अटक केली आहे. यामध्ये नागपाड्याचा मुबीन मूर्तझा खान (२३) आणि माझगावच्या नवाज वशीर शेख (२४) यांचा समावेश आहे.दोघेही आरोपी महाविद्यालयीन शिक्षण घेत आहेत. दोघांनाही अटक करण्यात आली असून, त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यातआली आहे.या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास गंगावणे यांनी दिली.

टॅग्स :विनयभंग