Join us

इन्स्टाग्राम हॅक करून पाठविले अश्लील मेसेज, अल्पवयीन मुलीचा प्रताप उघडकीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2018 06:39 IST

एका युवतीचे इन्स्टाग्राम खाते हॅक करून, तिच्या मित्र-मैत्रिणींना अश्लील फोटो, मेसेज पाठविणाऱ्या अल्पवयीन मुलीला गुन्हे अन्वेषण शाखेच्या कक्ष १० ने अंधेरी परिसरातून अटक केली.

- गौरी टेंबकर-कलगुटकरमुंबई : एका युवतीचे इन्स्टाग्राम खाते हॅक करून, तिच्या मित्र-मैत्रिणींना अश्लील फोटो, मेसेज पाठविणाऱ्या अल्पवयीन मुलीला गुन्हे अन्वेषण शाखेच्या कक्ष १० ने अंधेरी परिसरातून अटक केली. तिने हे कृत्य करण्याचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.१७ वर्षांच्या सीमा (नावात बदल) हिने ३ सप्टेंबर, २०१८ मध्ये मेघवाडी पोलिसांत तक्रार केली होती. तिच्या इन्स्टाग्राम खात्यावरून मित्र-मैत्रिणींना अश्लील मेसेज, फोटो, व्हिडीओ पाठविले जात होते. याचा तपास गुन्हे अन्वेषण शाखेचे कक्ष १० देखील करत होते. त्यांनी सीमाच्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईक या सर्वांकडे याबाबत चौकशी केली. मात्र, त्यांच्या हाती काहीच लागले नाही. अखेर त्यांनी तांत्रिक तपास करत एमआयडीसीतील हाजरानगर येथून १७ वर्षांच्या मुलीला ताब्यात घेतले. चौकशीत तिने गुन्हा मान्य केला. मात्र, असे का केले, याबाबत तिने अद्याप काहीच खुलासा केलेला नाही.तक्रारदार मुलगी सीमा हिला ती ओळखतही नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तिच्याकडून दोन मोबाईल फोन आणि राउटर हस्तगत करण्यात आले आहे. याचाच वापर तिने सीमाला मेसेज करण्यासाठी केला होता. ही मुलगी थोडी विक्षिप्त असून, तिने अशा प्रकारे अन्य काही मुलींना त्रास दिला आहे का, याबाबत चौकशी सुरू असल्याचे गुन्हे अन्वेषण शाखेच्या एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले.