लोकप्रिय घोषणा कागदावरच
By Admin | Updated: February 13, 2015 04:47 IST2015-02-13T04:47:11+5:302015-02-13T04:47:11+5:30
गतवर्षी अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या लोकप्रिय घोषणा कागदावरच राहिल्या आहेत. योग्य नियोजन न केल्यामुळे महत्त्वाचे प्रकल्प सुरू होऊ शकले नाहीत

लोकप्रिय घोषणा कागदावरच
नामदेव मोरे, नवी मुंबई
गतवर्षी अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या लोकप्रिय घोषणा कागदावरच राहिल्या आहेत. योग्य नियोजन न केल्यामुळे महत्त्वाचे प्रकल्प सुरू होऊ शकले नाहीत. यावर्षीचा अर्थसंकल्प शुक्रवारी सादर होत असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा नवीन आश्वासनांची खैरात केली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेचा सन २०१४ - १५ या वर्षाचा सुधारीत व २०१५ - १६ या वर्षासाठीचा मुळ अर्थसंकल्प शुक्रवारी स्थायी समितीमध्ये सादर होणार आहे. निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाकडे पूर्ण शहरवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे. यावर्षीही कोणतीच करवाढ केली जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. परंतु निवडणूका डोळ्यासमोर ठेवून लोकांची मने जिंकणाऱ्या प्रकल्पांची घोषणा होण्याची शक्यता आहे. परंतु पालिकेने २०१३ - १४ मध्ये तब्बल २६८० कोटीचा अर्थसंकल्प सादर केला होता. परंतु उत्पन्नाचा अंदाज चुकल्यामुळे पुन्हा १५३७ कोटीचा सुधारीत अर्थसंकल्प मंजूर करावा लागला. गतवर्षी पालिकेने १९५० कोटी रूपयांचा अर्थसंकल्प सादर केला होता. परंतु यावर्षीही उत्पन्नाचे अंदाज चुकले असल्याचे बोलले जात असून पुन्हा कमी रकमेचा सुधारीत अर्थसंकल्प सादर केला जाण्याची शक्यता आहे. गतवर्षी पालिकेने अनेक महत्त्वाकांक्षी योजनांची घोषणा केली होती. चांगली उद्याने, वाहन तळ, क्रीडांगणे व अनेक महत्त्वाकांक्षी योजनांचा समावेश केला होता. परंतु वर्षभरात बहुतांश सर्व योजना कागदावरच राहिल्या आहेत.
नवी मुंबईमध्ये पशुवैद्यकीय दवाखाना उभारणे, मोरबे धरण परिसरात थीम पार्क तयार करणे, महिला औद्योगिक प्रशिक्षण संस्था उभी करणे. व्यवसाय प्रशिक्षण केंद्र सुरू करणे. संगीत विद्यालय बांधणे, डेब्रीजवर प्रक्रिया करणारा प्रकल्प उभा करणे. ४ रात्रनिवारा केंद्र उभी करणे, रोडवर फिरणाऱ्या निराश्रीत मुलांकरीता दिवसा निवारा केंद्र तयार करणे, अडवली भुतावली परिसरात निसर्ग उद्यान उभारणे. शहरात संक्रमण शिबीर तयार करण्यात येणार होते. या व्यतिरिक्त अनेक महत्त्वाच्या योजनांची घोषणा करण्यात आली होती. परंतु वर्षभर विकासकामांचे योग्य नियोजन केले नाही. यामुळे चांगल्या योजना कागदावरच राहिल्या आहेत. जुनेच प्रकल्प पूर्ण करता आलेले नाहीत. रुग्णालय व इतर अनेक प्रकल्प रखडले आहेत. मागील वर्ष पालिकेसाठी निराशाजनक होते. येत्या वर्षासाठी अर्थसंकल्पात नक्की कोणत्याा घोषणा होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.