मुंबई शहर आणि उपनगरात येत्या गणेशोत्सवात पीओपी गणेशमूर्तींची विक्री आणि खरेदी होऊ नये, यासाठी मुंबई महानगरपालिकेने जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत. मुंबईतील गणेश मूर्तीकरांना पीओपी गणेशमूर्ती तयार करण्यास मज्जाव केल्यानंतर आता मुंबईबाहेरुन येणाऱ्या गणेशमूर्तींनाही शहरात प्रवेश बंदी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून कोकण विभागीय आयुक्तांना तसे पत्रही देण्यात आले आहे. अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली.
गणेशोत्सवादरम्यान मोठ्या प्रमाणात वापरण्यात येणाऱ्या पीओपी मूर्तींमुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होते. यासंदर्भात उच्च न्यायालयाने ३० जानेवारी २०२५ रोजी घातलेले निर्बंध आणि पीओपी मूर्तींवर बंदी घालण्याबाबत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने २०२० मध्ये केलेल्या सूचनांची अत्यंत प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आदेश महापालिकेने दिले आहेत. पर्यावरण विभागाचे उपायुक्त अविनाश काटे यांच्याकडे अंमलबजावणीची जबाबदारी आहे.
कोकण आयुक्तांकडून कारवाईच्या सूचनारायगड, ठाणे, सिंधुदुर्ग तसेच अन्य ठिकाणांहून मुंबईत येणाऱ्या पीओपी गणेशमूर्ती रोखण्यासाठी पालिकेने पावले उचलली आहेत. यासाठी कोकण विभागीय आयुक्तांनी तातडीने कार्यवाही करावी, अशी विनंती करण्यात आली आहे. कोकण आयुक्त कार्यालयानेही याला सकारात्मक प्रतिसाद देत त्याची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाईच्या सूचना दिल्या आहेत.
मुंबई महानगरपालिकेने पीओपी मूर्तींबाबत कितीही प्रतिबंध केला, तरी सर्वसामान्य नागरिकांना पीओपी गणेशमूर्ती परवडतात. त्यामुळे सर्वसामान्य गणेश भक्तांची पीओपी गणेशमूर्तींची मागणी जास्त असते, यावर्षीही अशीच मागणी नोंदवली जाणार आहे. याबाबत निश्चितच सरकारला सकारात्मक निर्णय घ्यावा लागेल आणि यासाठी आम्ही प्रयत्न करू.- हितेश जाधव, मुंबई अध्यक्ष, गणेश मूर्तिकार संघटना
प्रदूषणवाढीबाबत अभ्यासाची तयारीपीओपी गणेशमूर्ती या पर्यावरणाला पूरक आहेत अथवा पर्यावरणाचे किती नुकसान होते आणि किती प्रदूषण वाढते याबाबत सरकारच्या वतीने राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगातील तज्ज्ञांच्या समितीमार्फत अभ्यास करण्यात येणार आहे. त्यानंतर काही आवश्यक पावले उचलली जातील, असे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी स्पष्ट केले आहे.