Join us

स्वच्छतेत केली कुचराई; कंत्राटदाराला लाखांचा दंड; पालिका अ‍ॅक्शन मोडवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2023 10:30 IST

अनधिकृतपणे राडाराडा (डेब्रिज) टाकणाऱ्या अज्ञात व्यक्तींविरोधात पोलिस स्थानकात तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे. 

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या एम पूर्व विभाग हद्दीत शिव-पनवेल महामार्गावर, मानखुर्द जंक्शन ते वाशी टोल नाका या परिसरात स्वच्छता कामांमध्ये कुचराई केल्याबद्दल संबंधित कंत्राटदारास दोन लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे, तसेच त्यास कारणे दाखवा नोटीस देखील बजावण्यात आली आहे. त्याचप्रमाणे या भागात अनधिकृतपणे राडाराडा (डेब्रिज) टाकणाऱ्या अज्ञात व्यक्तींविरोधात पोलिस स्थानकात तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे. 

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी या परिसरात स्वच्छतेच्या अनुषंगाने केलेल्या पाहणी दौऱ्यादरम्यान हा प्रकार दिसल्यानंतर महानगरपालिका प्रशासनाने ही कार्यवाही केली आहे. त्यानंतर लगेचच डॉ. शिंदे यांच्या सूचनेनुसार या परिसरात मनुष्यबळ आणि संयंत्र नेमून तत्काळ स्वच्छता करण्यात आली आहे.

परिसर झाला कचरामुक्त :

डॉ. शिंदे यांच्या सूचनेनुसार, संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ३ यांत्रिकी झाडू, २५ कामगार, १ जेसीबी मशीन, १ बाँबकॅट मशीन, २ डंपर लावून हा परिसर कचरामुक्त करण्यास सुरुवात केली. या परिसरातून ५ डंपर राडारोडा उचलण्यात आला. मानखुर्द टी जंक्शन परिसरात अनधिकृत राडारोडा टाकला जातो. अनधिकृतपणे वारंवार राडारोडा टाकणाऱ्या व्यक्तींविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे, अशी माहिती सहायक आयुक्त अलका ससाने यांनी दिली आहे.

टॅग्स :मुंबईनगर पालिका