Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रदूषण मंडळाच्या मुख्यालयावर वंचित आघाडीचा मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2023 20:34 IST

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने सर्वाच्च न्यायालयाच्या निकालाला बगल देत भारत आर झोनमध्ये कंपन्यांना परवाने दिले आहेत.

श्रीकांत जाधव

मुंबई : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने सर्वाच्च न्यायालयाच्या निकालाला बगल देत भारत आर झोनमध्ये कंपन्यांना परवाने दिले आहेत. त्या निषेधात वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मुख्यालयासमोर गुरुवारी धिक्कार मोर्चा आयोजित करण्यात आला. 

वंचित बहुजन आघाडीच्या या मोर्च्यात मुंबई अध्यक्ष अबुल खान, महिला आघाडी अध्यक्ष सुनीता गायकवाड, परमेश्वर रणशूर, दौलत खान आदी मान्यवर सहभागी झाले होते. अनेक महिन्यांपासून वंचित बहुजन आघाडीकडे ठाणे, पालघर, नवी मुंबई तसेच मुंबईतील नागरिकांकडून तक्रारी आल्या होत्या. यात धोकादायक कंपन्यांना लायसन्स परमिट केले आहे आणि त्यामुळे या कंपन्यांच्या प्रदूषणामुळे काही आदिवासी पाड्यातील रहिवाश्यांना, झोपडपट्टी विभागातील नागरिकांना आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याचा दुष्परिणाम पर्यावरणावर तर होतोच आहे त्याचसोबत तिथल्या स्थानिकांच्या विशेषतः लहान मुलांच्या आरोग्यावर होत आहे. याचे गांभीर्य जाणून वंचित बहुजन आघाडी कडून हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता.

यावेळी आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर ह्याहून अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा वंचितने दिला. टाटा इन्स्टिट्यूट च्या रिपोर्ट नुसार अनेक मुंबईतील नागरिक हे दावाखान्यात आहेत याचे कारण म्हणजे स्वच्छ हवा श्वास घ्यायला मिळत नाही आहे.  सुप्रीम कोर्ट च्या आदेशाला डावलून यांनी ह्या कंपन्यांना परमिट दिले आहेत आणि इतर सर्व पक्ष आणि त्यांचे नेते यांनी स्वतःचे अर्थसंबंध जपण्यासाठी हे कारस्थान रचले आहे. यातून ते स्वतःच्या पक्षातील सालगडी, कॉन्ट्रॅक्टर, मित्र यांना श्रीमंत करण्यासाठी असे जाणीवपूर्वक करत आहेत, अशी घणाघाती टीका सुजात आंबेडकर यांनी केली.