वेसाव्याची खाडी प्रदूषित

By Admin | Updated: September 26, 2016 02:35 IST2016-09-26T02:35:29+5:302016-09-26T02:35:29+5:30

वेसावकरांची कामधेनू असलेली वेसाव्याची खाडी आता प्रदूषित झाली आहे. जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड येथील कारखान्यातून येणारे रसायनमिश्रित पाणी

Polluted from the Bay of Lakes Bay | वेसाव्याची खाडी प्रदूषित

वेसाव्याची खाडी प्रदूषित

मनोहर कुंभेजकर, मुंबई
वेसावकरांची कामधेनू असलेली वेसाव्याची खाडी आता प्रदूषित झाली आहे. जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड येथील कारखान्यातून येणारे रसायनमिश्रित पाणी, प्लॅस्टिक पिशव्यांचा भस्मासूर, कचरा आणि गटाराच्या दुर्गंधीयुक्त सांडपाण्यामुळे वेसावे खाडीची दैना झाली आहे. महापालिकेला याकडे लक्ष देण्यास वेळ नसल्याने, पर्यावरणाच्या संवर्धनासाठी तरुणाईच पुढे सरसावली असून, किमान या तरुणाईला तरी महापालिकेने हातभार लावावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
वेसावा खाडीला पूर्वी पाला खाडी म्हटले जायचे, असे वेसावा गावातील जुने जाणकार मच्छीमार सांगतात. पाला खाडी म्हणजे, येथे पाला या जातीचा काटेरी मासा मोठ्या प्रमाणात सापडायचा, असे गावातील जाणकार मच्छीमार गजानन साठी यांनी सांगितले. मात्र, आता खाडी प्रदूषित झाल्याने, कचरा आणि इतर कारणांमुळे बोट अडकते आणि मासेही मिळत नाहीत, असे मच्छीमार धर्मेंद्र महादेव साठी यांनी सांगितले.
वेसावा कोळी जमात ट्रस्टचे अध्यक्ष मनीष भुनगवले, कोळी महासंघाचे सरचिटणीस राजहंस टपके, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण भावे यांनी वेसावे खाडी प्रदूषित झाल्याचे सांगितले. खाडीत कचरा आणि प्लॅस्टिक अडकले असून, त्याचा मच्छीमारांना अत्यंत त्रास होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
वेसावा नाखवा मंडळचे अध्यक्ष देवेंद्र काळे आणि माजी अध्यक्ष पृथ्वीराज चंदी यांनी सांगितले की, ‘वेसाव्याची खाडी दीड किलोमीटरपर्यंत प्रदूषित झाली आहे. आता येथे मासळी मिळेनाशी झाली आहे.
वेसावा मच्छीमार कार्यकरी सहकारी सोसायटीचे माजी अध्यक्ष शशिकांत रामले, कोळी बांधव महादेव बांडुक व कृष्णा साठी, आमदार भारती लव्हेकर आणि महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशोधर
फणसे यांनीही याबाबत खंत व्यक्त केली आहे.

मासळी मिळत नाही
मासेमारीत केरळनंतर वेसाव्याचा दुसरा क्रमांक लागतो. वेसाव्यात सुमारे ५०० मच्छीमार नौका आहेत. सुमारे ५ ते ७ दिवसांच्या मासेमारीच्या एका ट्रीपला लागणारे डीझेल, बर्फ, खलाशांचा पगार मिळून सुमारे १.५ लाख खर्च येतो. मात्र, त्याच्या निम्यानेसुद्धा वेसावकरांना मासळी मिळत नाही.

पुन्हा गतवैभव
वेसावे खाडीतील गाळ काढून परिसरातील लोखंडवाला, गोरेगाव, मालाड, ओशिवरा येथून वाहणारे सांडपाणी, खाडी प्रदूषित करणारे १२ नाले यावर शासन आणि पालिका यांनी प्रतिबंधात्मक उपाय करून, खाडीला पुन्हा वैभव प्राप्त करून देण्यासाठी वेसावे गावातील युवा पिढीने मोलाचा वाटा उचलला आहे.

Web Title: Polluted from the Bay of Lakes Bay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.