Join us

गुजराती पाट्यांवरून मुंबईत राजकारण पुन्हा जोमात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2023 08:14 IST

‘मराठी भाषेचा मान राखलाच पाहिजे’; ‘दादागिरी खपवून घेतली जाणार नाही!’

मुंबईत गुजराती आणि मराठी हे दोन्ही समाज वर्षानुवर्षे गुण्यागोविंदाने राहत आहेत. त्यांच्यात परस्परांविषयी प्रेम आणि आदर आहे. मात्र, काही जण केवळ राजकारण करण्याच्या दृष्टीने काही मुद्दे उकरून काढत आहेत. दोन समाजात तेढ कशी निर्माण होईल आणि त्यायोगे आपली राजकीय पोळी कशी भाजून घेता येईल, असा काही राजकीय पक्षांचा प्रयत्न सुरू आहे. निवडणुका जवळ आल्यावर लोकांचे लक्ष मूळ प्रश्नापासून अन्यत्र वळवण्याचे उद्योगही मंडळी करू लागली आहेत.

घाटकोपर येथील चौकातील ‘मारू घाटकोपर’ तसेच ‘आर.पी. मेहता’ नामफलकाची मोडतोड आणि मुलुंड येथे मराठी महिलेला घर नाकारल्याचे प्रकरण या दोन्ही घटना भिन्न आहेत. मुलुंडप्रकरणी आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून तत्काळ दखल घेऊन सोसायटी व पोलिसांना कार्यवाही करण्यास सांगितले. त्यानुसार पुढील कार्यवाही झाली. त्याही पुढे जाऊन आम्ही सहकारी संस्थांच्या उपनिबंधकांना पत्र लिहिले होते. माझ्या पत्राची दखल घेत उपनिबंधकांनी तसे परिपत्रक जारी केले. या परिपत्रकाची अंमलबजावणी संपूर्ण मुंबईत झाली पाहिजे. आता घाटकोपर येथील मोडतोड करण्यात आलेल्या नामफलकाविषयी सांगतो. मराठीचा मान राखला पाहिजेच. 

आता मुद्दा मराठी पाट्यांचा! दुकाने किंवा आस्थापनांवर नामफलक मराठीतूनच असाव्यात, यात दुमत नाही. पालिका अधिकाऱ्यांनीही याबाबत प्रखरपणे भूमिका घेतली पाहिजे. मी पालिकेत नगरसेवक म्हणून काम करत असताना मराठी पाट्यांचा आग्रह धरला होता.

आ  पण ज्या राज्यात राहतो त्या राज्यातील राजभाषेचा सन्मान केलाच पाहिजे. आपण सन्मान नाही केला तर मग दुसऱ्या बाजूकडून अपमान होणार असे हे चक्र आहे. एकमेकांचा आदर राखला पाहिजे. अमराठी लोकांच्या पिढ्यान पिढ्या मुंबई - महाराष्ट्रात वाढल्या, हे मान्य. मात्र, इथल्या मूळ माणसाचे मूळ आणि कूळ अन्य मंडळींनी विसरू नये.मराठी पाट्यांविषयी राजसाहेब कधीपासून आग्रही होते. आता सर्वोच्च न्यायालयानेच निकाल दिला आहे. त्यामुळे मराठी भाषेचा सन्मान ठेवलाच पाहिजे. कुणाची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. मराठी माणसांना घर नाकारण्याचे प्रकार घडत आहेत. खाण्या-पिण्याच्या प्रत्येकाच्या सवयी वेगळ्या असतात. त्या समजून घेतल्या पाहिजेत. मुळात एखादा माणूस त्याच्या घरात काय खातो, काय पितो, हे डोकावून पाहण्याची गरज नाही. आपण एखाद्या राज्यात जाऊन दादागिरी केली तर खपवून घेतली जाईल का? त्यामुळे त्या-त्या राज्याचा मान राखावा. गुजराती दांडिया आम्ही आनंदाने खेळतो. महाराष्ट्राचा गणेशोत्सव सगळ्या देशभर साजरा केला जातो. त्यामुळे सौदार्हाचे वातावरण ठेवा, हे नम्र सांगणे.

घाटकोपरमधील गुजराती भाषेतील नामफलक कोणी तोडले माहिती नाही. नामफलक मराठीसह आणखी दोन भाषेत होता, असा दावा केला जात आहे. असेलही; परंतु, अनेकदा काय होते, मराठी लहान आकारात असते. हे असे चालणार नाही. मुंबई, महाराष्ट्र, मराठी भाषा, मराठी माणूस या सगळ्यांचा मानसन्मान महत्त्वाचा आहे. मुळात धर्म कोणताही असो, माणूस म्हणून चांगले बना. हिशोब कर्माचा होतो. धर्माचा नाही.

टॅग्स :गुजरात