लोकप्रतिनिधींच्या सत्कारातही राजकारण
By Admin | Updated: November 21, 2014 01:20 IST2014-11-21T01:20:01+5:302014-11-21T01:20:01+5:30
नवनिर्वाचित खासदार व आमदारांचा महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्कार करण्यास विलंब होऊ लागला आहे

लोकप्रतिनिधींच्या सत्कारातही राजकारण
नामदेव मोरे, नवी मुंबई
नवनिर्वाचित खासदार व आमदारांचा महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्कार करण्यास विलंब होऊ लागला आहे. यापूर्वी तीनही लोकप्रतिनिधी राष्ट्रवादीचेच असल्यामुळे तत्काळ सत्कार सोहळा उरकण्यात आला होता. परंतु यावेळी खासदार सेनेचा तर एक आमदार भाजपाचा असल्याने सत्कार होत नसल्याचे बोलले जात आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेने सर्वसाधारण सभेमध्ये विकासकामांच्या प्रस्तावाबरोबर सत्कार सोहळ्यांनाही प्राधान्य दिले आहे. २००९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये ठाणे मतदारसंघातून संजीव नाईक निवडून आले होते. विधानसभा निवडणुकीत बेलापूर मतदारसंघातून गणेश नाईक व ऐरोली मतदारसंघामधून संदीप नाईक विजयी झाले होते. या तिघांचाही सर्वसाधारण सभेत सत्कार करण्यात आला होता. इतर पक्षांचे उमेदवार निवडून आल्यानंतरही असेच सत्कार केले जावेत, अशी अपेक्षा केली होती. सर्वांनीच त्यावेळी मूक सहमती दर्शविली होती. महापालिकेने नवीन मुख्यालय बांधल्यानंतरही संजीव नाईक यांचा विशेष सत्कार करण्यात आला होता.
खासदार राजन विचारे यांचा सत्कार करण्यासाठी विरोधी पक्षनेत्या सरोज पाटील यांनी पत्र दिले होते. विधानसभेत भाजपाच्या मंदा म्हात्रे व राष्ट्रवादीचे संदीप नाईक दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. त्यांचाही सत्कार करण्यात यावा असे पत्र भाजपाच्या नगरसेविका विजया घरत यांनी दिले होते. नोव्हेंबरच्या सर्वसाधारण सभेत सत्कार घेण्यात यावा असा ठराव घेण्याचे पत्र प्रशासनास दिले आहे. परंतु दोन्ही आमदारांचा अद्याप सत्कार करण्यात आला नाही.