Join us

आरे कारशेडच्या विरोधाला राजकीय आ‘धार’

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2019 05:57 IST

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरेमध्ये मेट्रो कारशेड उभारण्याचा प्रश्न पुन्हा एकदा पेटला आहे.

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरेमध्ये मेट्रो कारशेड उभारण्याचा प्रश्न पुन्हा एकदा पेटला आहे. स्थानिक, पर्यावरणवादी, सेलिब्रेटींनी कारशेडला विरोध दर्शविल्यानंतर आता भाजप वगळता इतर सर्व राजकीय पक्षांनी यात उडी घेतली आहे. रविवारी (दि.१५) मुंबई काँग्रेसने आरे कॉलनीमध्ये कारशेडच्या भागातील वृक्षांचे पूजन करत विरोध दर्शविला, तर आझाद मैदानामध्ये मनसेच्या वतीने विरोध दर्शविण्यात आला. यात राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे आणि त्यांचा मुलगा अमित ठाकरे सामील झाले होते.आरेतील ३० एकरवर एमएमआरसीतर्फे कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ प्रकल्पासाठी कारशेड उभारण्यात येत आहे. यासाठी २,७०० झाडे तोडली जाणार असून, पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाने त्यास परवानगी दिली आहे. मात्र, याला पर्यावरणवाद्यांचा विरोध आहे.रविवारी या विरोधाची धार आणखीनच तीव्र झालेली दिसून आली. पर्यावरणवाद्यांनी सुमारे एक किलोमीटरपर्यंतची मानवी साखळी तयार करून कारशेडला विरोध दर्शविला, तर मुंबई काँग्रेसने कारशेडच्या जागेवर वृक्ष पूजनाचा कार्यक्रम करीत कारशेडला जोरदार विरोध केला. यावेळी माजी खासदार तथा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड, माजी अध्यक्ष संजय निरुपम, माजी आमदार चरणसिंग सप्रा, माजी आमदार अशोक जाधव यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.>झाडांच्या कत्तलीला मनसेचा विरोध - शर्मिला ठाकरेमेट्रो कारशेडच्या विरोधात रविवारी आझाद मैदानामध्ये विविध सेवाभावी संस्था आणि पर्यावरणवादी संघटनांनी आंदोलन केले. मनसेच्या वतीने शर्मिला ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी यात सहभागी होत आंदोलकांना समर्थन दिले. आरेमध्ये कारशेडसाठी होणाऱ्या झाडांच्या कत्तलीला आमचा विरोध आहे. विविध संघटनांनी आरेतील कारशेड विरोधात सुरू केलेल्या आंदोलनाला आमचा शंभर टक्के पाठिंबा असून, भविष्यातही पाठिंबा कायम राहिल, असे शर्मिला ठाकरे म्हणाल्या. यावेळी मनसेच्या पर्यावरण विभागाचे अध्यक्ष जय शृंगारपुरे, महिला उपाध्यक्ष रिटा गुप्ता आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.>शिवसेनेची भूमिकादुटप्पी - निरुपमभाजप आरेमधील २ हजार ७०० झाडे कापण्याचे षड्यंत्र रचत आहे. शिवसेना राज्यात आणि मुंबई महापालिकेत सत्तेवर आहे. मात्र, विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून सेना आरेमध्ये कारशेड उभारण्यास विरोध करीत आहे. ही शिवसेनेची दुटप्पी भूमिका आहे. काँग्रेसचा मेट्रोला विरोध नाही. मात्र, आरे कारशेडला पर्यायी जागा कांजूरमार्गला असताना आरेमध्येच कारशेड उभारण्याच्या आग्रहाला आमचा विरोध असल्याचे मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांनी सांगितले.