राजकारण्यांना ‘मैदान’ मोकळे!
By Admin | Updated: November 28, 2014 01:51 IST2014-11-28T01:51:14+5:302014-11-28T01:51:14+5:30
विकास आराखडय़ात खेळासाठी आरक्षित असलेल्या मैदानांवर आता जाहीर सभा घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

राजकारण्यांना ‘मैदान’ मोकळे!
मुंबई : विकास आराखडय़ात खेळासाठी आरक्षित असलेल्या मैदानांवर आता जाहीर सभा घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मात्र दादरचे शिवाजी पार्क हे मनोरंजन मैदान असल्याने या मैदानाची या निर्णयातून सुटका झाली.
खेळाच्या मैदानावर धार्मिक, शैक्षणिक कार्यक्रम, स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिन कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आयोजित करण्यास परवानगी होती. मात्र जाहीर सभा घेण्यास आतार्पयत बंदी होती. मंत्रिमंडळाने खेळाच्या मैदानावर जाहीर सभा घेण्यास मंजुरी दिल्याने येत्या महापालिका निवडणुकीच्या वेळी ही मैदाने सभांनी दणाणून जातील.
खेळाची मैदाने वर्षभरात 3क् दिवस खेळाव्यतिरिक्त अन्य कामाकरिता वापरण्याची मुभा दिली गेली होती. ही मुदत वाढवून 45 दिवस केली आहे. त्यामुळे आता खेळाची मैदाने वर्षभरात किमान दीड महिने खेळाकरिता उपलब्ध नसतील.
खेळाच्या मैदानांकरिता झालेला हा निर्णय मनोरंजन मैदानांना मात्र लागू होत नाही. दादर येथील शिवाजी पार्क हे मनोरंजन मैदान आहे. त्यावर जाहीर सभा घेण्यास कोर्टाने बंदी केली आहे. त्यामुळे सरकारच्या या निर्णयामुळे शिवाजी पार्कचा वापर जाहीर सभांकरिता कुठल्याही पक्षाला करता येणार नाही. शिवाजी पार्कवर होणारा शिवसेनेचा दसरा मेळावा कोर्टाच्या आदेशामुळे बंद झाल्यानंतर शिवसेना व अन्य पक्षांनी मैदानांवरील जाहीर सभांवरील बंदीबाबत नाराजी प्रकट केली होती. सरकारने आपल्या धोरणाचा पुनर्विचार करावा, असे मत व्यक्त केले होते. मात्र मागील सरकारने याबाबतचा निर्णय घेण्याचे टाळले होते. भाजपाने सत्तेवर येताच धोरणात बदल केला. खेळाच्या मैदानाकरिता स्वीकारलेले धोरण लोकांच्या गळी उतरले तर भविष्यात मनोरंजन मैदानावरही जाहीर सभा घेण्याचा मार्ग मोकळा होऊ शकेल. (विशेष प्रतिनिधी)