पालघर जिल्ह्यात राजकीय उलथापालथ?
By Admin | Updated: October 22, 2014 00:26 IST2014-10-22T00:26:33+5:302014-10-22T00:26:33+5:30
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी जो कौल दिला तो अत्यंत धक्कादायक असून त्याची परिणीती पक्षांच्या जिल्हास्तरावरील पदाधिकाऱ्यांची गच्छंती होण्यात घडून येणार आहे

पालघर जिल्ह्यात राजकीय उलथापालथ?
पालघर : नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी जो कौल दिला तो अत्यंत धक्कादायक असून त्याची परिणीती पक्षांच्या जिल्हास्तरावरील पदाधिकाऱ्यांची गच्छंती होण्यात घडून येणार आहे. यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, माकप, मनसे, शिवसेना, भाजप अशा सगळ्याच पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे.
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील सहा मतदारसंघापैकी तीन मतदारसंघात बविआ दोन मध्ये भाजपा आणि एका मतदारसंघात शिवसेना विजयी झाली आहे. यामुळे बविआने बजावलेली अपेक्षित कामगिरी वगळता बाकी सर्व पक्षांच्या वाट्याला निराशा आलेली आहे. शिवसेनेला ४ जागा जिंकण्याची अपेक्षा होती. भाजपलाही तशीच अपेक्षा होती. राष्ट्रवादी तेवढ्याच जागा जिंकण्यासाठी जीवाचा आटापिटा करीत होती. तर काँग्रेसला ३ जागा आणि मार्क्सवाद्यांना दोन जागा जिंकण्याची आशा होती. परंतु ती पूर्ण झालेली नाही.
काँग्रेसचे तर आदिवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र गावित पराभूत झालेत. या सर्व पक्षांनी आपआपल्या पराभवाचे जे प्राथमिक अहवाल दिले आहेत. त्यात निष्क्रिय पदाधिकारी, दुर्बल पक्षसंघटन, जनतेशी तुटलेली नाळ, वर्षानुवर्षे पदाधिकारी न बदलणे व नव्या नेतृत्वाला संधी न देणे अशी कारणे दिली आहेत. सध्या काँग्रेस ग्रामीणचे नेतृत्व दामू शिंगडा यांच्याकडे आहे. तर पालघर राष्ट्रवादीची धुरा आनंद ठाकूर यांच्याकडे आहे. शिवसेनेचे या भागातील नेतृत्व उत्तम पिंपळे, उदयबंधू पाटील, शिरिष चव्हाण, वसंत वैती यांच्याकडे आहे तर भाजपाची धुरा विष्णू सावरा यांच्याकडे आहे. कम्युनिस्टांचे नेतृत्व रामजी वरठांकडे होते. परंतु त्यांचीच हाकालपट्टी झाली आहे. सावरा आमदार झाले तरी पक्षाची कामगिरी मोदीलाट असूनही अन्यत्र धड झालेली नाही. त्यामुळे आता सगळ्याच पक्षांमध्ये राजकीय उलथापालथ होणार आहे. त्यासाठी दिवाळीनंतरचा मुहूर्त साधला जाणार आहे.
दिवाळी होऊ देणे आणि राज्यात सरकार अस्तित्वात येणे याचीच प्रतिक्षा सर्व राजकीय पक्षांना आहे. त्यानंतर आत्मचिंतन बैठका होऊन ही राजकीय नेतृत्वाची भाकरी फिरविण्याची प्रक्रिया सुरू होईल. अनेक पक्षातील बंडखोर नेत्यांनी विद्यमान निष्क्रियांची गच्छंती घडवून त्याजागी आपली वर्णी लागावी यासाठी मुंबई आणि दिल्ली येथे फिल्डींग लावणे सुरू केले आहे. (वार्ताहर)