Join us
Daily Top 2Weekly Top 5

मोनोच्या खांबांवर राजकीय पोस्टरबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 04:22 IST

ना.म. जोशी मार्गावरील प्रकार; उच्च न्यायालयाच्या आदेशाला केराची टोपली

मुंबई : करी रोड पश्चिमेकडील ना.म. जोशी मार्गावरील मोनो रेलच्या खांबांवर राजकीय पोस्टरबाजी सुरू आहे. राजकीय पक्षांच्या या चढाओढीमध्ये परिसराचे विद्रूपीकरण झाले आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशाला केराची टोपली दाखवणाऱ्यांवर संबंधित प्रशासन काय कारवाई करणार, असा सवाल स्थानिकांमधून उपस्थित केला जात आहे.ना.म. जोशी मार्गावर असलेल्या मोनो रेलच्या प्रत्येक खांबावर जाहिरात आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे पोस्टर चिकटवण्यात आले आहेत. यातील बहुसंख्य पोस्टर हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे आहेत. १४ जून रोजी झालेल्या राज यांच्या वाढदिवसाचे पोस्टर २ महिन्यांनंतरही तसेच ठेवण्यात आले आहेत. यामुळे परिसराचे विद्रूपीकरण होत आहेच, मात्र प्रशासनाला अधिकृत जाहिरातींमार्फत मिळणारा महसूलही बुडत असल्याचे एका स्थानिकाने सांगितले.मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वाढदिवसाचे फलक, बॅनर किंवा पोस्टर लावू नये, असे आदेश कार्यकर्त्यांना दिले होते. मात्र पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्याचा विसर पडल्याचे दिसत आहे. कारण मोनोच्या खांबांवरील पोस्टरमध्ये शुभेच्छुक म्हणून मनसेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष संजय जामदार आणि महाराष्ट्र राज्य लॉटरी सेनेचे अध्यक्ष विनायक म्हशिलकर यांची छायाचित्रे नावांसहित आहेत. याशिवाय स्थानिक पदाधिकाºयांनीही आपल्या नावांची हौस भागवली आहे. त्यामुळे प्रशासन आणि मनसेकडून या कार्यकर्त्यांवर कारवाई होणार का, असा स्थानिकांचा सवाल आहे.

टॅग्स :मेट्रोमुंबई