खलील गिरकर मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया सुरू होऊन २ दिवस उलटले असले तरी मुंबईतील विविध राजकीय पक्षांनी अद्यापही निवडणूक प्रचार साहित्याच्या खरेदीकडे लक्ष दिलेले नाही. निवडणूक प्रचारात झेंडे, टोप्या, बिल्ले यांसहित अनेक वस्तूंचा मोठा प्रभाव पडत असतो. या वेळी प्रचारासाठी विविध राजकीय पक्षांची निवडणूक चिन्हे असलेले प्लॅस्टिकचे फुगे व रात्रीच्या अंधारात झगमगणारे बिल्ले हे नवीन साहित्य बाजारात आले आहे. मात्र, अद्याप राजकीय पक्ष व उमेदवारांकडून पुरेशा प्रमाणात या वस्तूंची खरेदी सुरू झालेली नसल्याने विक्रेते ग्राहकांची प्रतीक्षा करीत असल्याचे चित्र आहे.
शिवसेना व भाजपची युती होण्यास विलंब झाल्याने टी शर्ट विक्री खालावली असल्याचे मत योगेश पवार यांनी व्यक्त केले. युती झाल्यानंतर सर्व पक्षांच्या नावांचा व चिन्हांचा उल्लेख टी शर्टवर असणे गरजेचे असल्याने या वेळी टी शर्ट विक्री जास्त होत नसल्याची माहिती त्यांनी दिली. मोबाइल, ओळखपत्र गळ्यात अडकवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या आयडी कार्ड नेक स्ट्रॅप मध्येदेखील पक्षाच्या नावांचा व चिन्हांचा वापर करण्यात आला आहे. आतापर्यंत झालेल्या विक्रीमध्ये शिवसेनेच्या प्रचार सामग्रीची सर्वांत जास्त विक्री झाली आहे.झगमगणाऱ्या बिल्ल्यांची किंमत १५ रुपयेपक्षाचे चिन्ह असलेले झेंडे, मफलर, साडी, टी-शर्ट, बटन, बिल्ले, टोपी, गांधी टोपी, वुलन मफलर, फेटे, कुर्ता-पायजमा आदी वस्तू विक्रीसाठी लालबाग परिसरातील दुकानांमध्ये उपलब्ध आहेत. झगमगणाºया बिल्ल्यांची किंमत १५ रुपयांपासून आहे, तर साधा बिल्ला ३ रुपयांना उपलब्ध आहे. प्लॅस्टिकच्या फुग्याची किंमत १० रुपयांपासून १७ रुपयांपर्यंत आहे. झेंडे अर्धा मीटर ते अडीच मीटर आकारात उपलब्ध आहेत.