राजकीय पक्षांची ‘चमकोगिरी’ सुरूच
By Admin | Updated: October 27, 2014 01:02 IST2014-10-27T01:02:38+5:302014-10-27T01:02:38+5:30
आम्ही अनधिकृत बॅनरबाजी करणार नाही, असे शपथपत्रांतून लिहून देणाऱ्या राजकीय पक्षांनी उच्च न्यायालयाच्या निर्देशाला हरताळ फासला आहे.

राजकीय पक्षांची ‘चमकोगिरी’ सुरूच
मुंबई : आम्ही अनधिकृत बॅनरबाजी करणार नाही, असे शपथपत्रांतून लिहून देणाऱ्या राजकीय पक्षांनी उच्च न्यायालयाच्या निर्देशाला हरताळ फासला आहे. बहुतेक राजकीय पक्षांमधील विजयी उमेदवारांसह हरलेल्या उमेदवारांकडून मतदारराजाचे आभार मानण्यासाठी बॅनरबाजीच्या माध्यमातून चमकोगिरी सुरूच असल्याचे राज्यभर दिसत आहे.
याबाबत याचिकाकर्ते वकील अॅड. उदय वारुंजीकर यांना विचारणा केली असता ते म्हणाले, की राजकीय पक्षांमार्फत होणाऱ्या बॅनरबाजीमुळे राज्याला बकाल स्वरूप आल्याची याचिका दाखल करण्यात आली होती. त्यातील सुनावणीत सर्वच राजकीय पक्षांना अनधिकृत बॅनरबाजी करणार नाही, अशी शपथपत्रे लिहून देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले होते. शिवाय अनधिकृत बॅनरवर देखरेख ठेवून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक स्वराज्य संस्थांना म्हणजे संबंधित पालिका, नगरपालिका आणि महानगरपालिकांना देण्यात आले होते. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर १० दिवस विशेष मोहीमही राबवण्यास न्यायालयाने सांगितले होते.
मात्र गेल्या आठ दिवसांतील मुंबईतील चित्र पाहता राजकीय पक्षांच्या जिंकलेल्या आणि हरलेल्या उमेदवारांकडून सर्रासपणे अनधिकृत बॅनरबाजी सुरू असल्याचे दिसून येते. विजयी आणि पराभूत उमेदवारांकडून मतदारराजाचे आभार मानणारे बॅनर मुंबईच्या चौकापासून नाक्यापर्यंत दिसत आहेत. यासंदर्भात मुंबई महानगरपालिका प्रशासनाला विचारणा केली असता कारवाई सुरू असल्याची माहिती देण्यात आली.
याउलट स्थानिक स्वराज्य संस्थांकडून समाधानकारक कारवाई दिसत नसल्याची प्रतिक्रिया वारुंजीकर यांनी दिली. ते म्हणाले, की राज्यभर राजकीय पक्षांची बॅनरबाजी सुरूच असून उच्च न्यायालयाच्या पुढील सुनावणीत ही बाब न्यायालयासमोर मांडणार आहे. अनधिकृत बॅनरबाजीबाबत शपथपत्र लिहून देणाऱ्या संबंधित पक्षांच्या सचिव किंवा संबंधित व्यक्तीसह कारवाईत दिरंगाई करणाऱ्या राज्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांनाही दोषी धरून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)