Join us  

राजकीय तिढा सुटला : मुख्यमंत्री बनले आमदार; उद्धव ठाकरेंसह नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 2:08 AM

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अवघ्या दहा मिनिटांत हा सोहळा उरकण्यात आला. यावेळी व्यासपीठावर विधानसभा अध्यक्ष नाना पाटोले, उपमुख्यमंत्री अजित पवार व्यासपीठावर होते.

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीवरून राज्यात निर्माण झालेला राजकीय पेच अखेर सोमवारी संपुष्टात आला. मुख्यमंत्र्यांसह विधानपरिषदेच्या उर्वरित आठ नवनिर्वाचित आमदारांनी सदस्यत्वाची शपथ घेतली. विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात झालेल्या सोहळ्यात विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक - निंबाळकर यांनी सर्वांना सदस्यत्वाची शपथदिली.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अवघ्या दहा मिनिटांत हा सोहळा उरकण्यात आला. यावेळी व्यासपीठावर विधानसभा अध्यक्ष नाना पाटोले, उपमुख्यमंत्री अजित पवार व्यासपीठावर होते. तर, मुख्यमंत्री ठाकरे पहिल्यांदाच आमदारकीची शपथ घेत होते. त्यामुळे या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे या देखील उपस्थित होत्या. उद्धव ठाकरे हे आमदारकीची शपथ घेणारे ठाकरे घराण्यातील दुसरे सदस्य आहेत. यापूर्वी आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवत विधानसभेत प्रवेश केला होता. सध्या ते महाविकास आघाडी सरकारमध्ये पर्यटन मंत्री आहेत.उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेच्या नीलम गोºहे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी, काँग्रेसचे राजेश राठोड यांनीही आमदारकीची शपथ घेतली. तर, भाजपकडून गोपीचंद पडळकर, प्रवीण दटके, रमेश कराड आणि रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ घेतली. भाजपचे गोपीचंद पडळकर खास धनगर शैलीतील घोंघडे आणि काठी अशा वेशात विधानभवनात आले होते.मुख्यमंत्री ठाकरे यांच्या आमदारकीवरून यंदाची विधान परिषदेची द्विवार्षिक निवडणूक गाजली. राजकीय आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. अखेर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी निवडणूक आयोगाला पत्र पाठवत निवडणूक घेण्याची विनंती केली. त्यानुसार निवडणूक कार्यक्रमाची घोषणा झाली. नऊ जागांसाठी १४ अर्ज दाखल झाले. एका अपक्षाचा अर्ज छाननीत बाद झाला. तर उरलेल्या १३ पैकी चारजणांनी अर्ज मागे घेतले. तर भाजपचे अधिकृत उमेदवार अजित गोपछडे यांच्या ऐवजी रमेश कराड यांचा उमेदवारी अर्ज कायम ठेवला गेला. त्यामुळे नऊ जागांसाठी नऊच अर्ज राहिल्याने निवडणूक बिनविरोध झाली.झालो आमदार...विधान परिषदेच्या सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. निवडून आल्याबद्दल राज्यपालांनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी रश्मी ठाकरे, राजशिष्टाचार व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे व मुख्य सचिव अजोय मेहता हे देखील उपस्थित होते.

टॅग्स :उद्धव ठाकरेविधान परिषद निवडणूक