पालिकेचे पार्किंगचे धोरण लटकलेलेच

By Admin | Updated: November 8, 2016 03:03 IST2016-11-08T03:03:40+5:302016-11-08T03:03:40+5:30

मुंबईत घर घेण्याइतकेच पार्किंगसाठी जागा मिळणेही कठीण झाले आहे. यामुळे पार्किंगच्या नावाखाली मुंबईकरांची लूटमारही अनेक ठिकाणी होत आहे.

The policy of the municipal parking lot is lying | पालिकेचे पार्किंगचे धोरण लटकलेलेच

पालिकेचे पार्किंगचे धोरण लटकलेलेच

शेफाली परब, मुंबई
मुंबईत घर घेण्याइतकेच पार्किंगसाठी जागा मिळणेही कठीण झाले आहे. यामुळे पार्किंगच्या नावाखाली मुंबईकरांची लूटमारही अनेक ठिकाणी होत आहे. मात्र, यावर नियंत्रण आणण्यासाठी आखलेले पार्किंगचे सुधारित धोरण मात्र, गेल्या दोन वर्षांपासून सरकार दरबारी धूळ खात पडले आहे. परिणामी, महापालिकेला वार्षिक दहा कोटी रुपयांच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागत आहे.
नोव्हेंबर २०१३ मध्ये पार्किंगच्या दराची मुदत संपली़ त्यामुळे सुधारित दर अंमलात आणतानाच, मुंबईतील पार्किंगला शिस्त लावण्यासाठी पालिकेने नवीन धोरण आणले़ त्यानुसार, निवासी सोसायटीबाहेरील पार्किंग, रात्रीचे पार्किंग, रस्त्यावरील पार्किंगवर निर्बंध आणण्यात येणार आहेत. जानेवारी २०१५ मध्ये पार्किंगच्या सुधारित दरांना पालिका महासभेची मंजुरी मिळाली. या धोरणाचा प्रयोग दक्षिण मुंबईत कुलाबा, चर्चगेट, कफ परेड, फोर्ट या विभागातून झाला.
मात्र, रस्त्यावर उभ्या असलेल्या प्रत्येक गाडीसाठी मालकाला महिन्याला १८०० रुपये भरावे लागणार असल्याने, यास उच्चभू्र वसाहतीतून विरोध झाला. भाजपा नेत्यांकडूनच यास विरोध होऊ लागल्यावर या धोरणाला राज्य सरकारने स्थगिती दिली. विद्यमान दरातून पालिकेला दरवर्षी अडीच कोटी रुपयांचे उत्पन्न मिळत असते. सुधारित दरांमुळे यामध्ये आणखी सात ते आठ टक्क्यांची वाढ होणार आहे.


हिरवा कंदील
मिळण्याच्या प्रतीक्षेत
सुधारित धोरणाच्या प्रयोगाला दक्षिण मुंबईतील रहिवाशांचा विरोध झाला. यामुळे नागरिकांकडून सूचना व हरकती मागवून त्याबाबत सुनावणी घेतल्यानंतर, सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले होते. त्यानुसार, पालिकेने दक्षिण मुंबईतील नागरिकांच्या संघटनेशी चर्चा करून हरकती व सूचनांचा समावेश करीत, मार्च महिन्यांत सरकार दरबारी अहवाल सादर केला आहे. मात्र, त्यानंतर अद्यापही धोरणाबाबत शासनाने कोणताच निर्णय
घेतलेला नाही.

पालिकेचे नगर विकास खात्याला साकडे
मुंबईत वाहनांची संख्या वाढत असल्याने पार्किंगची जागा कमी पडू लागली आहे. नवीन इमारतींच्या तळाला अशी पार्किंगची सोय करणे शक्य असून तशी सक्तीही विकासकांना केली जात आहे. परंतु पार्किंगसाठी आखण्यात येणाऱ्या अशा बऱ्याच योजना धोरण लटकल्यामुळे बारगळल्या आहेत. त्याचबरोबर उत्पन्नही बुडत असल्याने पालिकेने नगर विकास खात्याला पत्र पाठवून हे धोरण लवकर मार्गी लावण्याची विनंती केली आहे.


पार्किंगचे धोरण कशासाठी?
मुंबईतील दीड कोटी जनता बस व रेल्वेतून दररोज प्रवास करीत असते़ उर्वरित १५ ते २० टक्के खासगी वाहनांतून प्रवास करतात़ ही वाहने रस्त्याच्या कडल्याला उभ्या राहिल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत असतो़, तसेच आजच्या घडीला पार्किंगसाठी तासाला १५ ते २० रुपये आकारले जातात़
मुंबईत वाहनांची संख्या वर्षागणिक वाढत असल्याने वाहतुकीची कोंडी, वाहने उभी करण्याची समस्या व रस्त्यावर बेकायदा पार्किंग व दामदुप्पट वसुली वाढू लागली आहे़ या सर्व समस्यांवर तोडगा काढण्यासाठी पार्किंगचे नवीन धोरण पालिकेने आणले आहे़

भूमिगत वाहनतळासाठी शोधाशोध
१९९१ च्या विकास आराखड्यात भूमिगत पार्किंगची शिफारस करण्यात आली होती. मात्र, यावर आत्तापर्यंत कोणत्याच हालचाली झालेल्या नाहीत. भूमिगत पार्किंगची व्यवहार्यता तपासण्यासाठी आता सल्लागार नेमण्यात येणार आहेत. पार्किंगची समस्या दिवसेंदिवस वाढत असल्याने, पालिका आयुक्त अजय मेहता यांनी पार्किंग योग्य जागेची शोधाशोध करण्याचे आदेश शनिवारी अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले.

पार्किंगसाठी सध्या तासाला १५ ते २० रुपये आकारले जातात़
रायगड, ठाणे या जिल्ह्यातून मोठ्या संख्येने खासगी वाहने मुंबईत येत असतात.
दीडशे वाहनांमागे एक पार्किंगची जागा अशी सध्याची स्थिती आहे.
महापालिकेची ८८ वाहनतळ रस्त्यावर असून काही बहुमजली पार्किंग आहेत.
क्रॉफर्ड मार्केट म्हणजेच महात्मा फुले मंडई येथे भूमिगत पार्किंग प्रस्तावित होते. मात्र, त्यावरून राजकीय वाद पेटल्याने हा प्रस्ताव रद्द झाला.

२०१३ मध्ये पार्किंगच्या दराची मुदत संपली़ त्यामुळे सुधारित दर अमलात आणतानाच मुंबईतील पार्किंगला शिस्त लावण्यासाठी पालिकेने नवीन धोरण आणले़ त्यानुसार, निवासी सोसायटीबाहेरील पार्किंग, रात्रीचे पार्किंग, रस्त्यावरील पार्किंगवर निर्बंध आणण्यात येणार आहेत. जानेवारी २०१५ मध्ये पार्किंगच्या सुधारित दरांना पालिका महासभेची मंजुरी मिळाली.

पार्किंगचे नवीन दर
श्रेणी ए - फोर्ट, हुतात्मा चौक, हॉर्निमन सर्कल, बॉम्बे हॉस्पिटल लेन, चर्चगेट, जहाँगीर आर्ट गॅलरी, नरिमन पॉइंट, ताजमहल हॉटेल, दादर टी़टी़, जी़बी़ मार्ग, गोरेगाव स्पोर्ट्स क्लब अशा ठिकाणी पार्किंगसाठी प्रत्येक तासाला ६० रुपये़
श्रेणी बी - रिगल सिनेमा, पोलीस जिमखाना, नेपयन्सी रोड, फेमस स्टुडिओ लेन, बी़जी़ खेर मार्ग, न्यू प्रभादेवी रोड़ या ठिकाणी पार्किंगसाठी ४० रुपये़
श्रेणी सी - बी़डी़ माझदा अपार्टमेंट, घाटकोपर, माहुल रोड शॉपर्स स्टॉपजवळ या ठिकाणी २० रुपये ताशी पार्किंगचे दर असणार आहे़

Web Title: The policy of the municipal parking lot is lying

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.