कारच्या धडकेत पोलीस व महिला जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 00:52 IST2020-01-05T00:52:47+5:302020-01-05T00:52:50+5:30
नाकाबंदी दरम्यान कारने दिलेल्या धडकेत एक पोलीस शिपायासह एक महिला जखमी झाले.

कारच्या धडकेत पोलीस व महिला जखमी
मुंबई : नाकाबंदी दरम्यान कारने दिलेल्या धडकेत एक पोलीस शिपायासह एक महिला जखमी झाले. जोगेश्वरीत शनिवारी सकाळी हा प्रकार घडला. या प्रकरणी पोलीस अधिक चौकशी करत आहेत. जोगेश्वरी पश्चिम द्रुतगती महामार्गावर शनिवारी सकाळी साडेसातच्या सुमारास नाकाबंदी सुरू होती. त्यावेळी जोगेश्वरी पोलीस ठाण्याची मोबाइल व्हॅन क्रमांक १ आणि त्यातील कर्मचारी त्या ठिकाणी हजर होते. त्याच दरम्यान एक स्विफ्ट डिझायर (एमएच ०२ इच ४४४७) ही कार तिथे भरधाव वेगात आली. महिला चालकाचा कारवरील ताबा सुटला आणि तिने या कारने कर्तव्यावर हजर असलेल्या पोलीस शिपायाला जोरदार धडक दिली. त्यामुळे त्यांच्या दोन्ही हातांना मुका मार लागला, तर या अपघातात महिलेचा डावा हात फ्रॅक्चर झाला.
या दोघांनाही जवळच्या ट्रामा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यानुसार, पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत असून, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र नेर्लेकर यांनी सांगितले.