पोलिसांच्या बदल्या पारदर्शीपणे होणार!
By Admin | Updated: May 28, 2014 01:00 IST2014-05-28T01:00:42+5:302014-05-28T01:00:42+5:30
या वर्षी पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील अधिकारी व कर्मचार्यांच्या बदल्या पारदर्शीपणे होणार आहेत. आयुक्त स्वत: या प्रक्रियेवर बारीक लक्ष ठेवत आहेत.

पोलिसांच्या बदल्या पारदर्शीपणे होणार!
नवी मुंबई : या वर्षी पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील अधिकारी व कर्मचार्यांच्या बदल्या पारदर्शीपणे होणार आहेत. आयुक्त स्वत: या प्रक्रियेवर बारीक लक्ष ठेवत आहेत. कोणत्याही स्थितीमध्ये वशिलेबाजीला स्थान दिले जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. प्रत्येक वर्षी मे महिन्यात पोलीस अधिकारी व कर्मचार्यांची बदल्यांसाठी धावपळ सुरू होते. स्वत:च्या मनाजोगे पोलीस स्टेशन, वाहतूक शाखा व इतर ठिकाणी वर्णी लावून घेण्यासाठी वशिलेबाजी सुरू होते. राजकीय नेत्यांनाही मध्यस्थी करण्यास भाग पाडले जाते. बदल्यांसाठी कितीचा आकडा सुरू आहे, त्याची खुलेआम चर्चा होत असते. परंतु यावर्षी आयुक्त के. एल. प्रसाद यांनी पारदर्शीपणे बदल्या केल्या जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. ज्यांच्या बदल्या होणे अपेक्षित आहे त्यांना त्यांच्या मनाच्या तीन जागांचा पर्याय देण्यात आला आहे. या तीन पर्यायांपैकी एखाद्या ठिकाणी बदली केली जाईल. सदर पर्यायाप्रमाणे बदली शक्य नसेल तर संबंधितांची नियमाप्रमाणे योग्य ठिकाणी बदली करण्यात येणार आहे. आयुक्तालय क्षेत्रातील अधिकारी व कर्मचार्यांनी बदल्यांसाठी कुठेही वशिलेबाजी करू नये. वरिष्ठांना व त्रयस्थ व्यक्तीला मध्यस्थी करण्यास सांगू नये. जर कोणीही अशाप्रकारे नियमबाह्यपणे बदलीसाठी प्रयत्न केल्यास फसवणूक होण्याची शक्यता असल्याचा इशारा आयुक्तांनी दिला आहे. जर कोणाला काही म्हणणे मांडायचे असेल तर त्यांनी थेट मांडावे. त्यांच्या सूचनांचा चौकटीत बसून विचार केला जाणार आहे. बदलीची प्रक्रिया पारदर्शीपणेच राबविली जाणार असल्याचेही आयुक्त प्रसाद यांनी स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)