कारवाईवेळी पोलिसांकडून शिवीगाळ ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2015 02:51 IST2015-08-12T02:51:58+5:302015-08-12T02:51:58+5:30
लॉजमध्ये पोलिसांनी प्रवेश केल्यानंतर आमच्याशी एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे वर्तणूक दिली. अर्वाच्च व अश्लील शिवीगाळ करीत आम्हाला पोलीस ठाण्यात आणण्यात आले, अशी तक्रार कारवाई

कारवाईवेळी पोलिसांकडून शिवीगाळ ?
मुंबई : लॉजमध्ये पोलिसांनी प्रवेश केल्यानंतर आमच्याशी एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे वर्तणूक दिली. अर्वाच्च व अश्लील शिवीगाळ करीत आम्हाला पोलीस ठाण्यात आणण्यात आले, अशी तक्रार कारवाई झालेल्या जोडप्यांनी मंगळवारी केली. उत्तर प्रादेशिक विभागाच्या अपर आयुक्तांच्या कार्यालयात त्यांचे जबाब नोंदविण्यात आले. त्यावेळी पोलिसांकडून झालेल्या वर्तनाबाबत त्यांनी रोष व्यक्त केला आहे.
अद्याप चौकशी सुरू असून त्याबाबत काहीही सांगू शकत नाही. याप्रकरणी दोन दिवसांत वरिष्ठांना अहवाल देणार असल्याचे अपर आयुक्त फत्तेसिंग पाटील यांनी सांगितले.
परिमंडळ अकराचे पोलीस आयुक्त विक्रम देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली मालवणी पोलिसांनी ६ आॅगस्टला मढ, आक्सा, दानापानी किनाऱ्यावरील आणि परिसरातील लॉजची झडती घेऊन १३ जोडप्यांसह ६४ जणांवर कारवाई केली होती. सर्वांना अत्यंत अवमानकारक वागणूक देण्यात आली. त्यात एका तरुणीला महिला पोलिसांकडून मारहाण केल्याचा आरोप होत आहे. सोशल मीडियावरून याबाबत टीकेची राळ उडाल्याने पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी या प्रकरणाची चौकशी विभागातील अपर आयुक्त फत्तेसिंग पाटील यांच्याकडे सोपवली आहे. आज महिला निरीक्षक मधुलिका ठाकूर यांनी या प्रकरणी कारवाई केलेल्या तरुणीचे जबाब नोंदविले. यावेळी त्यांनी पोलिसांनी कसलीही विचारणा न करता थेट कारवाई केल्याचे म्हटले आहे. आम्ही काहीतरी मोठा गुन्हा केलेला असावा, अशा अविर्भावात आमच्याशी वर्तणूक करण्यात आली.
काहीही ऐकून न घेता पोलीस ठाण्यात आणले, असे जबाब बहुतांश जणींनी दिल्याचे समजते. प्रत्येकाला स्वतंत्रपणे बोलावून साधारण २० ते २५ मिनिटे जबाब घेण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
लॉज वादग्रस्त : पोलिसांनी ज्या तीन लॉजेसची तपासणी केली त्यामधील एक लॉज अत्यंत वादग्रस्त आहे़ या ठिकाणी एका अभिनेत्याच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला होता. बलात्कारप्रकरणी दोन दाखल गुन्हे या ठिकाणाशी संबंधित आहेत. महाविद्यालयीन तरुण-तरुणींचा नेहमी या ठिकाणी वावर असतो़ त्यामुळे स्थानिक आमदारांनी लॉजवर कारवाई करण्याची मागणी पोलिसांकडे केल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
उपायुक्त, वरिष्ठ निरीक्षकांवर कारवाई ?
गेल्या तीन महिन्यांत मालवणी पोलीस दुसऱ्यांदा वादग्रस्त बनले आहेत. जून महिन्यात विषारी दारूकांडामुळे १०२ जणांचा मृत्यू झाला होता. तेव्हा वेळीच कारवाई न केल्यामुळे पोलीस वादात सापडले होते. आता लॉजेसवर केलेल्या कारवाईमुळे पोलीस अडचणीत आले आहेत.
या प्रकरणात उपायुक्त, वरिष्ठ निरीक्षकांवर बदलीची कारवाई होण्याची शक्यता वरिष्ठ सूत्रांकडून वर्तविण्यात येत आहे. अपर आयुक्त पाटील यांच्या अहवालानंतर आयुक्त राकेश मारिया यांच्याकडून कारवाई केली जाणार आहे.
पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी या प्रकरणाची चौकशी अपर आयुक्त फत्तेसिंग पाटील यांच्याकडे सोपवली आहे.