‘हॉर्न’विरोधात पोलीस रस्त्यावर

By Admin | Updated: November 8, 2016 02:50 IST2016-11-08T02:54:37+5:302016-11-08T02:50:57+5:30

सणांच्या काळात होणारे ध्वनी आणि वायुप्रदूषण कमी करण्यासाठी सामाजिक संस्थाबरोबरच वाहतूक पोलीस, मुंबई पोलिसांनीही जनजागृतीचा विडा उचलल्याने हे प्रदूषण कमी करण्यात चांगले यश येत आहे

Police in the streets against 'Horn' | ‘हॉर्न’विरोधात पोलीस रस्त्यावर

‘हॉर्न’विरोधात पोलीस रस्त्यावर

मुंबई : सणांच्या काळात होणारे ध्वनी आणि वायुप्रदूषण कमी करण्यासाठी सामाजिक संस्थाबरोबरच वाहतूक पोलीस, मुंबई पोलिसांनीही जनजागृतीचा विडा उचलल्याने हे प्रदूषण कमी करण्यात चांगले यश येत आहे. गणेशोत्सव, नवरात्रौत्सवापाठोपाठ मोठ्या उत्साहात साजऱ्या करण्यात आलेल्या दिवाळीतही मुंबईकरांकडून चांगला प्रतिसाद मिळाला असून, आता मुंबईकरांनी गाड्यांचे हॉर्न वाजविणे कमी करून ध्वनिप्रदूषण कमी करण्यास साथ द्यावी, असे आवाहन मुंबई पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी सोमवारी केले.
मुंबईकरांनी गेल्या वर्षीप्रमाणेच मोठ्या उत्साहात रात्री उशिरापर्यंत दिवाळी साजरी केली. मात्र या वर्षी प्रदूषण कमी होणारे फटाके वापरले. पोलिसांनीही रात्री १० वाजल्यानंतर फटाके वाजविण्यास बंदी घातली होती. तसेच मैदानात, मोकळ्या जागांमध्ये फटाके न वाजवता रहिवासी भागांत फटाके वाजविणाऱ्यांवरसुद्धा मोठ्या प्रमाणात कारवाई केल्याने ध्वनी आणि त्यासोबतच वायुप्रदूषणावर आळा बसला. सणांच्या काळात होणारे ध्वनी आणि वायुप्रदूषण कमी करण्यासाठी मुंबईकरांनी जशी साथ दिली, तशीच साथ गाड्यांचे हॉर्न वाजविल्याने होणारे प्रदूषण कमी करण्यात द्यावी. एकाने हॉर्न वाजविला की त्याच्या आजूबाजूचे चालक गाड्यांचे कर्कश हॉर्न वाजवितात. अर्धा मिनिटसुद्धा वाट न बघता हॉर्न वाजविण्यामुळे मोठ्या प्रमाणात ध्वनिप्रदूषण होत आहे.
दिवाळीत फटाक्यांमुळे झालेल्या ध्वनिप्रदूषणात एक हजार जणांवर कारवाई करण्यात आली. गेल्या काही महिन्यांत विनाकारण हॉर्न वाजवून ध्वनिप्रदूषण केल्याप्रकरणी सुमारे १२ हजार जणांवर कारवाई झाली. त्यामुळे मुंबईकरांनीही ध्वनिप्रदूषण कमी करण्यात पोलिसांना साथ द्यावी, असे पडसळगीकर यांनी सांगितले. ते सोमवारी पोलीस आयुक्तालयात पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी सह पोलीस आयुक्त कायदा व सुव्यवस्था देवेन भारती, पोलीस उपायुक्त अशोक दुधे, आवाज स्वयंसेवी संस्थेच्या संयोजक सुमेरा अब्दुल अली आणि इंडियन मेडिकल असोसिएशनचे सचिव पार्थिव संघवी आदी उपस्थित होते.
गेल्या अनेक वर्षांपासून दिवाळीसह अन्य सण साजरे करताना मोठ्या प्रमाणात फटाके वाजविले जात असल्याने ध्वनी आणि वायुप्रदूषण होत होते. मात्र प्रशासकीय यंत्रणा आणि सामाजिक संस्थांकडून वारंवार होत असलेल्या जनजागृतीला या वर्षी मुंबईकरांनी चांगला पाठिंबा दिला आहे. गेल्या वर्षीच्या मुंबईतील १२५ डेसिबल आवाजाच्या तुलनेत या वर्षी १० डेसिबलने कमी नोंदविण्यात आली आहे. आवाज या स्वयंसेवी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात ही बाब समोर आल्याचे संस्थेच्या संयोजक सुमेरा अब्दुल अली यांनी सांगितले.
दिवाळीच्या काळात मुख्यत्वे करून मुंबईच्या उपनगर परिसरात ध्वनी आणि वायुप्रदूषणाचे प्रमाण कमी होते. हे प्रदूषणाचे प्रमाण सार्वजनिक ठिकाणी तसेच चैपाट्यांवर त्या तुलनेत अधिक जाणवले. मात्र सरासरी ७० टक्क्यांनी हे प्रदूषणाचे प्रमाण कमी झाले आहे. रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांचीही संख्या घटली असून, दरवर्षी या काळात होणारे अस्थमा, हार्ट अ‍ॅटॅक, ब्रेन स्ट्रोक हे फटाक्यांमुळे होणारे आजार घटले आहेत. पोलीस यंत्रणा, स्थानिक स्वयंसेवी संस्था
आणि महाराष्ट्र शासनाकडून सुरू असलेल्या शाळासह अन्य स्तरांवरील मार्गदर्शन शिबिरांचे हे यश म्हणावे लागेल, असे इंडियन मेडिकल असोसिएशनचे सचिव पार्थिव संघवी यांनी सांगितले. 

Web Title: Police in the streets against 'Horn'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.